Advertisement

फक्त ' मुलीचं ' असा विचार करत नाहीत


फक्त ' मुलीचं ' असा विचार करत नाहीत
SHARES

'आजकालच्या मुलींना नुसतं वेगळं राहायला आवडत ,सासू-सासरे नको, फक्त नवरा हवा ' हे असं वाक्य माझ्या बरोबर तुमच्यातल्या प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच ऐकलं असेल. पण या 'आजकालच्या' मुलींमध्ये खरचं सगळ्या मुली येतात का? हल्ली एकत्र कुटुंब पद्धत म्हणजे आजी-आजोबा ,आई-बाबा , काका-काकी,  त्यांची मुलं हे असं एकत्र घर एखाद् दुसरं सोडलं की कुठेही पाहायला मिळत नाही हे नक्की. पण सासू- सासरे नकोत असं सगळ्याच मुलींच मत नाहीये. एप्रिल महिना लागला की सगळीकडेच लग्नाची लगबग पाहायला मिळते. मग म्हंटल जरा ह्या विषयावर लग्न ठरलेल्या आणि होणाऱ्या मुलामुलींशी बोलून बघूयात की, त्यासुद्धा या 'आजकालच्या' मुलींमध्ये मोडतात का ?

मी स्वता: अगदी छोट्या कुटुंबात म्हणजे आई-बाबा आणि मी एवढेच राहत आहोत. अगदी लहानपणापासूनच मला छोट्या कुटुंबात राहायची सवय आहे. तरीही मला मात्र लग्नानंतर एकत्र म्हणजे माझ्या सासू- सासऱ्यांबरोबरच राहायचय. त्याच कारण असं की, मला स्वतःला कधी आजी आजोबांच्या प्रेमात वाढायला मिळालं नाही. पण मी नेहमी माझ्या मित्र मैत्रिणींच्या आजी आजोबांना पहात आलेय. नातवंडे आणि आजी आजोबांचं नातं मी पाहिलंय त्यामुळे मला नाही किमान माझ्या मुलांना तरी ते नातं, प्रेम अनुभवायला मिळायला हवं असं मला वाटत. आणि दुसरी गोष्ट घरात आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं असलेलं नेहमीच चांगलं म्हणून मला तरी सासू सासरे घरात हवेतच.

वैभवी ठोसर ( आर्किटेक्ट )



माझं लग्न ठरलंय आणि मलाही लग्नानंतर सासू - सासरे यांच्या बरोबरच राहायला आवडेल. मी अशा फील्ड काम करते जिथे जायची वेळ तर निश्चित आहे मात्र यायची नाही.त्यामुळे मला नक्कीच सासूची मदत होईल. फक्त काम करण्यासाठी सासू हवी असं अजिबात नाहीये. पण घरात माणसं असायला हवीत असं वाटत. माझा होणारा नवराही सारखा मुंबई बाहेर जात असतो. तेव्हा घरात एकटं राहण्यापेक्षा मला सासू सासरे असावेत असं वाटत.

दीप्ती राणे ( पत्रकार )


आपल्या समाजात लग्न झाले की, मुलगी तिच्या आई - बाबांना सोडून सासरी येते. तेव्हा स्वतःच्या कुटुंबाला सोडून येण्याचं दुःख एका मुलीला चांगलचं माहित असतं. मग आपण आपल्या नवऱ्याला त्याच्या कुटूंबापासून लांब का करायचं? दुसरं असं की, घरात काही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर आई वडिलांची नेहमीच मदत होते. मग लग्नानंतर मानसिक आधार तर आहेच पण कोणत्याही महत्वाच्या निर्णयासाठी आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे असणारे सासू सासरे असतील तर नक्कीच त्यांची मदत होईल. म्हणून मला लग्नानंतर घरात सासू सासरे असावेत असं वाटत .

रेश्मा पटेल ( ऑपरेशन्स  )

मी स्वतः एकत्र म्हणजे आजी आजोबा आई-बाबा, मोठा  भाऊ यांच्याबरोबर लहानाची मोठी झालेय. त्यामुळे लग्नानंतर फक्त मी आणि नवरा असे दोघंच घरात, हे मला तरी नकोय. घरात बोलायला गोष्टी शेअर करायला माणसं असायलाच हवीत. मानसिक आधार हा नक्कीच महत्वाचा आहे आणि तो नवऱ्याबरोबरच आई वडिलांचा म्हणजेच  सासू सासऱ्यांचा ही तेवढाच महत्वाचा आहे .

ओवी सावंत ( फॅशन डिझायनर )


माझ्या मते एकत्र कुटुंबात राहणं हे नेहमीच चांगलं. स्वतःला आणि भविष्यात आपल्या मुलांना नक्कीच त्याचा फायदा होतो. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या लहान मूळ आई वडिलांकडे न बोलता आजी आजोबांकडे जास्त मनमोकळेपणाने बोलतात. आता आपण सगळेच बघतोय की, मुलगा मुलगी दोघेही जॉब करणारे असतात. अशा बिझी शेड्युल मध्ये शारीरिक आणि मानसिक थकवा साहजिकच येतो तेव्हा मॉरल सपोर्ट हा आई वडिलांकडून मिळतो. तसच आपले वाईट आणि चांगले दिवस वाटून घेण्यासाठी कुटुंबात माणसं असणं गरजेचं आहे. आपल्या संस्कृतीबद्दल, सणांबद्दल नक्कीच ते आपल्यापेक्षा जास्त चांगलं शिकवतील. त्यामुळं घरात सासू - सासरे असणे नक्कीच चांगलं.

स्नेहा देसाई ( अकाउंटंट )


हे लिहीत असताना मी अशा मुलींना विसरले नाहीये ज्या लग्नाआधीच 'तु वेगळं राहणार की आई बाबांबरोबरच' हा प्रश्न आधी विचारतात आणि अशाही मुलींना विसरले नाहीये, ज्यांनी वेगळं रहात नाही म्हणून नवऱ्यालाच सोडून दिलंय. सगळ्याच मुली चांगल्या असं मी अजिबात म्हणणार नाही. आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींचे आपण साक्षीदार असतो. पण म्हणून प्रत्येक वेळी सगळ्याच मुलींना एकाच तराजूत नाही ना तोलू शकत? बरं वेगळं राहण्यासाठी फक्त मुलीचं जबाबदार आहेत असं ही नाही कारण या विषयावर लिहिताना मी माझ्या काही  मित्रांशीही बोलले ज्यांची लग्न ठरली आहेत. त्यातल्या एकाने सांगितलं , "माझ्या घरी माझी वहिनी आधीपासूनच सगळं बघत आली आहे ती स्वभावाने खूप शांत आहे पण माझी होणारी बायको मात्र अगदी उलट म्हणजे खूप पटकन चिडणारी आहे. त्यामुळं मी स्वत:च लग्नानंतर वेगळं राहणार आहे. अर्थात ह्या मागे माझ्या बायकोमुळे माझ्या घरच्यांना त्रास होऊ नये हीच भावना आहे". तर दुसऱ्या मित्रानेही त्याच्या होणाऱ्या बायकोला तसच सांगितलंय. त्याची आई आणि होणारी बायको दोघीही फटकळ आहेत. त्यामुळे घरात काही वाजलंच तर दोघीही हार मानणार नाहीत. त्यापेक्षा वेगळं राहणंच बरं. आता असं सांगितल्यावर त्या मुलीने तरी काय करावं ?

यावरून एकच लक्षात येतं की, काही मुली स्वतःहून वेगळं राहण्याचा हट्ट करत असतीलही पण काही त्याला अपवादही आहेत. मुलींना जस वेगळं घर हवंय, त्यात मूलेही मागे नाहीत. त्यामुळे या 'आजकालच्या' मुली म्हणताना (त्यांना नाव ठेवताना) जरा अपवाद असणाऱ्या मुलींचाही विचार करा.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा