Advertisement

मुंबईत 'अंडरवॉटर फेस्टिवल'चा थरार


SHARES

आयुष्यात काहीतरी तुफानी करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. तुमच्यापैकी काहींची बकेट लिस्ट तयारही असेल. स्कुबा डायविंग, स्काय डायविंग, पॅराग्लायडिंग आणि बंजी जंपिंग असे अनेक अॅडव्हेंचर प्रत्येकाच्या विशलिस्टमध्ये असतातच. अशीच एका भन्नाट स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी विलेपार्लेतल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलन येथे शनिवार आणि रविवारी आयोजित करण्यात आली होती. 

सायकलिंग, चेस, टिकटॅक, हॉकी अशा अनेक स्पोर्ट्स एक्टिव्हिटींचा यात समावेश आहे. या स्पोर्ट्स एक्टिव्हिटी मैदानात नाही तर अंडरवॉटर खेळल्या गेल्या. सायकलिंग, चेस, हॉकीसारखे गेम अंडरवॉटर कसे खेळणार? असे प्रश्न नक्कीच तुम्हाला पडले असतील. इंडिया अंडरवॉटर फेस्टिव्हल आणि फिनकिक अॅडव्हेंचरतर्फे मुंबईत पहिल्यांदाच अंडरवॉटर फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता.

पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलला मुंबईकरांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या फेस्टिव्हलमध्ये अंडरवॉटर प्ले ग्राऊंड उभारण्यात आलं होतं. यात स्कुबा डायविंगचा आनंद अनेकांनी लुटला. स्कुबा डायविंगला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा या इव्हेंटचा उद्देश आहे. खरंतर समुद्रात स्कुबा डायविंग केले जाते. स्कुबा डायविंग करायचे असेल तर तारकर्ली, गोवा किंवा अंदमान येथे जावे लागते. या ठिकाणी ये-जा करण्यात खूप खर्च होतो. त्यामुळेच फिनकिक अॅडव्हेंचरनं मुंबईत स्विमिंग पुलमध्ये स्कुबा डायविंगची संकल्पना राबवली आणि त्यात त्यांना यश आलं.

अंडरवॉटर फेस्टिव्हलला अंदाजे १൦൦൦ मुंबईकरांनी प्रतिसाद दिला होता. त्यापैकी ५൦൦ मुंबईकरांनी स्कुबा डायविंगमध्ये सहभाग घेतला. याशिवाय अंडरवॉटर हॉकी, वॉटर स्लॅकलायनिंग, अंडरवॉटर चेस, पोलो, सायकलिंग अशा अनेक गेम्सचाही समावेश होता. अंडरवॉटर हॉकी हा परदेशात खेळला जाणारा खेळ आहे. पण पहिल्यांदाच हा खेळ मुंबईत आयोजित अंडरवॉटर फेस्टिव्हलमध्ये खेळला गेला. अंडरवॉटर हॉकी ही नवीन थीम आहे. भारताची अंडरवॉटर हॉकी टीम तयार करण्यासाठी 'सीमाज'नेच सांगितलं होतं. त्यानुसार ही टीम तयार करण्यात आली.

-अंकित साबू, को फाऊंडर, फिनकिंक अॅडव्हेंचर

वॉटर स्लॅकलायनिंग हा एक भन्नाट प्रकार येथे पाहायला मिळाला. वॉटर स्लॅकलायनिंग म्हणजे हवेत एका दोरीवर जसा बॅलेन्स करतात त्याप्रकारे स्विमिंग पुलवर एक दोरी बांधली जाते. त्यावर बॅलेन्स केला जातो. त्यामुळे तुम्ही पडलात तरी पाण्यातच पडाल आणि तुम्हाला कोणतीही इजा होणार नाही.

या अंडरवॉटर फेस्टिव्हलची खासियत म्हणजे दिव्यांगांनीही यात सहभाग घेतला होता. राहुल रामुगडे हा त्यापैकीच एक. राहुल रामुगडेनं पॅरा स्विमिंग असोशिएशननं अलिकडेच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यानं ३ सुवर्णपदकं पटकावली होती. मनात जिद्द आणि इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता, हे राहुलनं सिद्ध केलं. राहुलनं इथं स्कुबा डायविंग ते स्केटिंग अशा सर्व गेम्समध्ये सहभाग घेतला.

'पाडि' या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रशिक्षक येथे ट्रेनर म्हणून उपस्थित होते. गोवा, श्रीलंका, इंडोनेशिया अशा देशांतून 'पाडि' इन्स्ट्रक्टर या इव्हेंटसाठी मुंबईत आले होते. त्यामुळे ज्यांना स्विमिंग येत नव्हतं अशांनीही या फेस्टिव्हलला आपली उपस्थिती दर्शवली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा