Advertisement

व्यंगालाही दिलं आव्हान! त्यांच्या प्रेमाला दृष्टीची गरज भासलीच नाही!

ही लव्हस्टोरी आहे भिकाजी आणि संगीता कोल्हापूरे या जोडप्याची. दोघेही दृष्टीने अधू..अगदी लहानपणापासूनच. पण त्यांच्या जाणीवा प्रचंड ताकदीच्या होत्या. हा एकच धागा त्यांना एकत्र घेऊन आला. आणि त्यांच्यातल्या प्रेमाला नवा अर्थ मिळाला. बॉलिवुडमधल्या काबिल चित्रपटाचं कथानक वाटतंय ना? विश्वास बसत नसला, तरी ते आहे तसं!

व्यंगालाही दिलं आव्हान! त्यांच्या प्रेमाला दृष्टीची गरज भासलीच नाही!
SHARES

दृष्टी नसतानाही त्यांनी एकमेकांना पाहिलं... प्रत्यक्ष न पाहाताही ते एकमेकांना समजले... आणि त्यांनी मिळून प्रेमाचा एक नवा अर्थ जगाला समजावला! प्रेम पाहिल्यानं नाही, तर समजल्यानं होतं... तगतं.. आणि यशस्वी होतं!


ही लव्हस्टोरी म्हणजे चित्रपटातलं कथानकच!

ही प्रेमकहाणी आहे भिकाजी आणि संगीता कोल्हापूरे या जोडप्याची. दोघेही दृष्टीने अधू.. अगदी लहानपणापासूनच. पण त्यांच्या जाणीवा प्रचंड ताकदीच्या होत्या. हा एकच धागा त्यांना एकत्र घेऊन आला. आणि त्यांच्यातल्या प्रेमाला नवा अर्थ मिळाला. बॉलिवुडमधल्या काबिल चित्रपटाचं कथानक वाटतंय ना? विश्वास बसत नसला, तरी ते आहे तसं!


संघर्षावरही आनंदानं मात

केवळ परीक्षा देण्यासाठीच दोघांचा जन्म झाला असावा की काय? असं वाटावं इतकं त्या दोघांच्याही आयुष्यात दु:ख. भिकाजी आणि संगीता दोघंही दृष्टीहीन. असं असतानाही दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. अडथळ्यांची शर्यत पार करत दोघेही जीवनाचा गाडा आनंदानं हाकत आहेत.


त्यांची मनं जुळली आणि व्यंगही असेनासं झालं!

भिकाजी आणि संगीता यांची पहिली ओळख 12वीत असताना झाली. दोघेही बदलापूर इथल्या आदर्श महाविद्यालयात 12 वीचं शिक्षण घेत होते. नकळत दोघांची मैत्री झाली. 12वीच्या अभ्यासात येणाऱ्या समस्या एकमेकांच्या साथीनं दोघं सोडवायचे. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. तसं पहायला गेलं तर हल्ली दिसण्याला किती महत्त्व दिलं जातं. गोरीपान मुलगीच हवी. मुलगा हँडसमच हवा. पैसा हवा. घर, कुटुंब, जात अशा कितीतरी गोष्टींचा विचार केला जातो. पण यांचं प्रेम या सर्व गोष्टींच्या पलीकडचं आहे.

आपला देखील छोटासा का होईना पण सुखी संसार असावा असं दोघांचं स्वप्न. अखेर ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं दोघांनी ठरवलं. 12 वीची परीक्षा झाल्यानंतर 2010 साली भिकाजी आणि संगीता यांनी कोर्टात लग्न केलं. 


पोटापाण्यासाठी खडतर प्रवास

लग्न तर केलं पण पोटाची खळगी भरण्यासाठी फक्त प्रेम असून चालत नाही. त्यासाठी पैसाही लागतो याची जाणीव भिकाजी आणि संगीता या दोघांना होती. नोकरी मिळेपर्यंत भिकाजी एक वर्ष रेल्वेमध्ये छोट्या मोठ्या वस्तू विकून गुजराण करत होते. पण त्यासोबतच इतर ठिकाणी ते नोकरीसाठी प्रयत्न देखील करत होते. अखेर 2013 साली मुलुंडमधल्या एका सेंटच्या कंपनीत ते ज्युनिअर मॅनेजर म्हणून लागले. डेटा एन्ट्री आणि सेंट स्मेलिंग या कामासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली.


आणि चिमुकल्या पावलांनी 'तो' आला!

2013 हे साल त्यांच्यासाठी दुहेरी आनंद देणारं ठरलं. या वर्षी भिकाजींना नोकरी तर मिळालीच, पण त्याचबरोबर त्यांच्या घरी एका चिमुकल्याचं आगमनही झालं. दोघांच्या अंधारलेल्या आयुष्यातला तो प्रकाश होता. मुलाच्या रूपानं दोघांचं सुखी संसाराचं स्वप्न पूर्ण झालं. आज त्यांचा मुलगा 5 वर्षांचा आहे.

गेल्या 8 वर्षांपासून दोघंही शारीरिक व्यंगत्वावर मात करत हिकमतीनं संसार करत आहेत. दोघांचं वांगणीला स्वत:चं एक छोटसं घर आहे. पण भिकाजी यांचा अर्ध्याहून अधिक पगार हा घराच्या हप्त्यामध्येच जातो. हप्ता भरून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांवर दोघांच्या संसाराचा गाडा चालतोय.


पत्नीला शिकवण्याची भिकाजींची जिद्द

इतक्या अडचणी असूनही भिकाजींनी जिद्द सोडलेली नाही. संगीता यांना शिकवण्याचा त्यांचा मानस आहे. संगीता सध्या फर्स्ट इयरचं शिक्षण घेत आहेत. शिक्षण सांभाळून संसाराच्या रहाटगाड्यात संगीता नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच जिद्दीनं उतरल्या आहेत. डोळ्यांना दिसत नसलं तरी संसाराचं गणित संगीता अचूक सांभाळतात.

पण मी लिहिलं आणि आपण वाचलं तितका त्यांचा संसार आणि त्यांचा संघर्ष अजिबात सोपा नाही. किंबहुना, बाहेरून जितका सहज सोपा तो वाटतो, त्याहून कितीतरी जास्त कठीण आणि संयमाची परीक्षा घेणारा आहे. पण त्याला या दोघांची तयारी आहे. नव्हे, त्या तयारीनंच हे दोघे संसारात उतरले आहेत.

एवढं सगळं असूनही, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नियतीचे चटके बसूनही भिकाजी आणि संगीतामधलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. उलट ते अधिकाधिक मजबूत होतंय. अजूनही एकमेकांचा स्पर्श त्यांच्या भावना पोहोच करण्यासाठी पुरेसा ठरतो. ना त्यांना एकमेकांना बघण्याची गरज पडते, ना ऐकण्याची! या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने भिकाजी आणि संगीताच्या या उत्कट प्रेमाला मुंबई लाइव्हचा सलाम!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा