Advertisement

वेडात मनसे कार्यकर्ते पोहोचले 'कारागृहात'!

शुक्रवारी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची रवानगी न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत केली होती. सोमवारी याप्रकरणी कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर या ८ जणांची रवानगी थेट आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्यासह 'वेडात कार्यकर्ते पोहोचले कारागृहात' असं म्हणण्याची वेळ आली आहे!

वेडात मनसे कार्यकर्ते पोहोचले 'कारागृहात'!
SHARES

फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनापासून मुंबईत सुरु झालेला राजकीय राडा अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची रवानगी न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत केली होती. सोमवारी याप्रकरणी कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर या ८ जणांची रवानगी १८ डिसेंबरपर्यंत म्हणजेच २ आठवड्यांसाठी थेट आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्यासह 'वेडात कार्यकर्ते पोहोचले कारागृहात' असं म्हणण्याची वेळ आली आहे!


कुठून झाली सुरुवात?

सर्वात प्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या सभेमध्ये '१५ दिवसांत फेरीवाल्यांना हटवा, नाहीतर मनसे हटवेल', असा इशारा पालिका प्रशासनाला दिला होता. मात्र, या मुदतीमध्ये कारवाई न झाल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांना जबरदस्तीने हटवले.


मालाडमध्ये विभाग अध्यक्षाला मारहाण

यानंतर, मालाडमध्ये फेरीवाल्यांविरोधात मनसे करत असलेल्या कारवाईदरम्यान काही फेरीवाल्यांनी आक्रमक रूप धारण केलं. यामध्ये मालाडच्या मनसे विभाग अध्यक्षाला जबरदस्त मारहाण करण्यात आली. त्याला भेटण्यासाठी लागलीच राज ठाकरेही मालाडमध्ये पोहोचले होते. त्यानंतर, विक्रोळीमध्ये झालेल्या राड्यानंतर मनसेचे उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळे यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्यांना जबर जखमी करण्यात आले. यामध्ये शेवाळेंच्या कवटीला फ्रॅक्चर झाले होते. 


संजय निरूपम फेरीवाल्यांसाठी सरसावले

एकीकडे फेरीवाल्यांच्या विरोधात उतरलेल्या मनसेने प्रशासनाचं काम करायला सुरुवात केली असतानाच, दुसरीकडे काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने विधानं करण्यास सुरुवात केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मनसे आणि संजय निरूपम यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी सुरु झाली.


आर्थर रोड कारागृहात रवानगी

यातूनच पुढे वाढलेल्या वादामुळे शुक्रवारी सकाळी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी लागलीच कारवाई करत संदीप देशपांडे यांच्यासह अन्य सात मनसे कार्यकर्त्यांना अटक केली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर सोमवारी त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना २ आठवड्यांसाठी म्हणजेच १८ डिसेंबरपर्यंत आर्थर रोड कारागृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

येत्या बुधवारी, म्हणजेच ६ डिसेंबर रोजी या सर्वांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यांचे वकील अॅड. राजेंद्र शिरोडकर यांनी लगेच जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.


कोण जाणार आर्थर रोड कारागृहात?

तोडफोडीप्रकरणी पकडण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये संदीप देशपांडे यांच्यासह विशाल कोकणे, संतोष धुरी, अभय मालप, दिवाकर पडवळ, योगेश छिले, हरीश सोलंकी यांचा समावेश आहे. या सगळ्यांना दंगल, ट्रेसपासिंग त्याचबरोबर तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.हेही वाचा

सर्जिकल स्ट्राईकनंतर निरूपम यांच्यावर मनसेचं पोस्टर'वार'


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा