Advertisement

राज्यपालांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्यासाठी संजय राऊतांविरोधात कारवाई : शिवसेना

मुंबई आणि ठाण्यातून गुजराती व राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर तुमच्याकडे पैसाच उरणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. त्यावरून सामनातून टीका करण्यात आली आहे.

राज्यपालांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्यासाठी संजय राऊतांविरोधात कारवाई : शिवसेना
SHARES

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात करण्यात आलेली ही कारवाई राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर पडदा टाकण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

“राज्यपाल हे एक घटनात्मक आणि प्रतिष्ठेचे पद आहे. अनेक राज्यपालांनी या पदाची प्रतिष्ठा राखत काम केले. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल मात्र यास अपवाद ठरले आहेत. गेल्या साधारण तीनेक वर्षांपासून भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राजभवनात आहेत. या काळात त्यांनी महाराष्ट्र सेवेपेक्षा भाजपा सेवाच जास्त केली, पण शुक्रवारी तर त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, अस्मितेवरच घाव घातला,” अशी टीका शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केलीय.

राज्यपालांनी केलेलं विधान आणि त्यावरुन होणारा वाद टाळण्यासाठी संजय राऊतांविरोधात कारवाई करण्यात आल्याचा आरोपही शिवसेनेनं केलाय.

“महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी मराठी माणूस व महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्रात त्या विधानावरून संतापाचा भडका उडाला. तो भडका व रोष कायम असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ‘ईडी’ने रविवारी पहाटे धाडी टाकून राज्यपालांच्या भीषण वक्तव्यावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला. हे अपेक्षित होतेच. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी महाराष्ट्रात अशा कारवाया सुरू केल्या तरी लोकांच्या मनातील भडका विझणार नाही,” असं या लेखात म्हटलं आहे.

“मुळात मराठी माणसांकडे पैशांची श्रीमंती नसली तरी राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि कष्ट करण्याबाबतची श्रीमंती आहे. मराठी माणूस म्हणजे निधड्या छातीचा सह्याद्री असून हा सह्याद्री संकटसमयी नेहमीच हिमालयाच्या मदतीस जात असतो व ही निधडी छाती पैशांच्या श्रीमंतीत मोजता येत नाही. देशाच्या सीमेवर मराठा पलटणी प्राणांची बाजी लावून लढत आहेत व मराठी हुतात्म्यांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेटय़ा महाराष्ट्राच्या गावांत पोहोचतात तेव्हा ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’, ‘भारतमाता की जय’च्या गर्जना घुमतात. हीच महाराष्ट्राची श्रीमंती आहे. महाराष्ट्रात कष्टकरी समाज नसता तर पैशांचे मोल राहिले असते काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.



हेही वाचा

भाजप घाबरली म्हणून संजय राऊत यांना अटक करण्यास लावलं : सुनील राऊत

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, आता 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा