Advertisement

वरळीतून आदित्य ठाकरेंची उमेदवारी निश्चित? म्हणून शरद पवारांकडे फिल्डींग

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे.

वरळीतून आदित्य ठाकरेंची उमेदवारी निश्चित? म्हणून शरद पवारांकडे फिल्डींग
SHARES

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भातील घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईतील शिवसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. आदित्य येत्या ३ आॅक्टोबर रोजी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आदित्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे ते पहिले सदस्य ठरतील.   

एबी फॉर्मचं वाटप

घटस्थापनेचा मुहूर्त साधत शिवसेनेकडून काही उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या संभाव्य यादीत आदित्य यांचं देखील नाव असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्यापासून आदित्य वरळीतून निवडणूक लढवणार असं म्हटलं जात होतं. परंतु त्यानंतर त्यांच्यासाठी ग्रामीण महाराष्ट्रातील मतदारसंघाचीही चाचपणी सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मध्यंतरी आदित्य यांनी वरळी, माहीम येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत ५ वर्षांत इतकं काम करू की, इथला विकास बघायला जगातील नेते येतील, असं म्हणत वरळी नक्की झाल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. 

हेही वाचा- तयारी राज्यरोहणाची!

पवारांची भेट

पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळं खळबळ माजलेली असताना शनिवारी दुपारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान 'सिल्व्हर ओक' इथं जाऊन त्यांची भेट घेतली होती. ही भेट कौटुंबिक असल्याचं राऊत त्यावेळी म्हणाले होते. परंतु आदित्य यांचा संभाव्य विधानसभा प्रवेश सुकर व्हावा, यासाठी ही भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

राष्ट्रवादीकडून आव्हान

सचिन अहिर भलेही राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसची अजूनही या मतदारसंघात ताकद असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय राष्ट्रवादीने या मतदारसंघात शिवसेनेला जोरदार टक्कर द्यायचं ठरवलं आहे. अशा स्थितीत आदित्य इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांना विरोध होऊ नये, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं समजतं आहे.

पुढच्या पिढीसाठी...

सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या असताना शिवसेनेने बारामतीतून उमेदवार दिला नव्हता. पवारांनी शिवसेनेची ही विनंती मान्य केल्यास पवार कुटुंबातील पुढच्या पिढीला म्हणजेच, रोहित पवार किंवा पार्थ पवार यांनाही भविष्यात त्याचा फायदा मिळू शकतो, असाही अंदाज लावला जात आहे. 

सध्या तरी आदित्य यांच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत असून वरळीतील शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.



हेही वाचा-

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ८० जणांना उमेदवारी जाहीर

आधी मुंबईतील खड्डे भरा; मग महाराष्ट्र घडवा! मुंबईकरांकडून आदित्य ठाकरे ट्रोल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा