कोरोनाच्या संकटाकडे पाहता यावर्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची की नाही, हा निर्णय सर्वस्वी गणेश मंडळांवर अवलंबून आहे. तरीही सर्व गणेशोत्सव मंडळांनी नेहमीप्रमाणे या वर्षीही गणेश मंडपाची परवानगी महापालिकेकडून घ्यावी. न्यायालयीन लढ्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या भविष्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे, असं आवाहन भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. (all ganeshotsav mandals must apply for ganesh pandals to bmc says bjp mla ashish shelar ahead of ganesh festival)
याबाबत बोलताना आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महापालिकेकडे मंडप उभारण्याच्या परवानगीसाठी अर्ज केले जातात. असे दरवर्षी सुमारे १२ हजारांच्यावर अर्ज मुंबई महापालिकेकडे येतात. यावर्षी मात्र केवळ सहाशे ते साडेसहाशेच अर्ज महापालिकेकडे आले आहेत. माझी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विनंती आहे की, त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेकडून गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी अर्ज करून घ्यावी. ठाकरे सरकार सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीत बोटचेपं धोरण का घेतंय मला माहीत नाही, असं आशिष शेलार म्हणाले.
हेही वाचा - Ganesh Festival 2020: कोकणी माणसांशी सरकार असं का वागतंय?- आशिष शेलार
सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहन! कृपया सर्व गणेशोत्सव मंडळांनी या वर्षीही मंडपाची परवानगी पालिकेकडून घ्या...गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची की नाही, हा निर्णय तुमचा.. पण परवानगी घ्या...न्यायालयीन लढ्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या भविष्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. pic.twitter.com/9DljfgrO68
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 30, 2020
खरं तर ठाकरे सरकारमध्ये बसलेले पक्ष व नेत्यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या संघर्षात कशाच्या आधारे न्याय मिळाला, हे ठाऊक नाही. सातत्य आणि परंपरा याआधारे हा न्याय मिळाला आहे. म्हणूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही परवानगी घेणं अती आवश्यक आहे. पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी. किंबहुना माझी महापालिकेला विनंती आहे की गेल्या वर्षीच्या आकड्यांच्या आधारावर सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपण स्वत:हून परवानगी द्यावी व तशा पद्धतीचं पत्र व अध्यादेश जारी करावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी महापालिकेकडे केली.
याआधी कोकणातील गणेशोत्सवाबाबतील बोलताना आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाता येईल की नाही या शंकेने चाकरमान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोकणातील ग्रामस्थांच्या मनामध्ये देखील भीती आहे. ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्याकडे पाहता कोकणात येणाऱ्यांना क्वारंटाईन करावं लागेल, असं त्यांचं मत आहे. सरकार मात्र आपली भूमिका का स्पष्ट करत नाही, असा प्रश्न सरकारला विचारला होता.
हेही वाचा - Ganesh Festival 2020: चाकरमान्यांनो, गणेशोत्सवाला कोकणात जाऊ नका, जयराज साळगावकरांचं आवाहन