Advertisement

'असा' होता वाजपेयींचा पत्रकार ते पंतप्रधानपदाचा प्रवास..!

आपल्या करकिर्दीत भारतात अनेक बदल घडवून आणण्यात आणि भारताच्या विकासात मोलाचा वाटा असणाऱ्या वाजपेयी यांचा एक पत्रकार ते पंतप्रधान हा प्रवास कसा होता? जाणून घेऊया पुढीलप्रमाणे

'असा' होता वाजपेयींचा पत्रकार ते पंतप्रधानपदाचा प्रवास..!
SHARES

भारताचे माजी पंतप्रधान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दीर्घ आजरानं निधन झालं. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरच श्वास घेतला. 

शांत स्वभाव, कधीही कुठल्या कार्यामध्ये मागे न हटलेले धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख होती. अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार आणि खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.

आपल्या करकिर्दीत भारतात अनेक बदल घडवून आणण्यात आणि भारताच्या विकासात मोलाचा वाटा असणाऱ्या वाजपेयी यांचा एक पत्रकार ते पंतप्रधान हा प्रवास कसा होता? जाणून घेऊया पुढीलप्रमाणे


कुठे झाला जन्म

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वालियरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील कृष्णा बिहारी वाजपेयी आणि आई कृष्णा देवी यांच्या सहवासात वाजपेयी यांचं बालपण गेलं. ग्वॉल्हेरमधील एका शाळेत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हिक्टोरिया कॉलेजात त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. पुढे कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून वाजपेयी यांनी राज्य शास्त्रात एम. ए. ची पदवी घेतली. आयुष्यभर अविवाहित राहिलेले वाजपेयी राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होते. मासिक राष्ट्रधर्म, साप्ताहिक पांचजन्य, स्वदेश आणि वीर अर्जुन यांसारख्या अनेक दैनिकांचं वाजपेयींनी संपादन केलं. 


भारत छोडो चळवळीमध्ये सहभाग

ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या १९४२ मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी दशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्‍त्र आणि कायद्याचे विद्यार्थी असलेल्या वाजपेयींना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली आणि विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी या कौशल्याचा उपयोग केला. 


संसदेत दबदबा 

१९५१ ला स्थापन झालेल्या भारतीय जन संघाचे वाजपेयी संस्थापक सदस्य होते. वाजपेयींचा राजकारणातला सुरुवातीचा काळ खडतर होता. अटल बिहारी वाजपेयींनी १९५७ मध्ये पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला. भारतीय जन संघाचे खासदार ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान हा प्रवास अटल बिहारी वाजपेयींनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर यशस्वीपण केला. सत्तेत असो किंवा नसो, चार दशकांपेक्षा जास्त काळ वाजपेयींनी संसदेत आपला दबदबा कायम ठेवला. 

'ही' जबाबदारीही यशस्वीपणे पेलली

खासदार म्हणून संसद गाजवणारे अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा मंत्री झाले ते जनता सरकारच्या काळात... पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र खात्याची जबाबदारी १९७७ ते १९७९ या काळात यशस्वीपणे पेलली. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत आणि परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष आणि एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली

कवी मनाचा राजकारणी

सलग नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आलेले व लोकनेते असा नावलौकिक असलेले अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. इतकंच नव्हे तर आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून संगीत व पाक कलेतही विशेष रस दाखवत. काव्यशास्त्र विनोदात रमणारा कवी मनाचा राजकारणी म्हणूनही त्यांची विशेष ओळख होती.


नेहमी धाडसी निर्णय घेत

१९९६ साली अटल बिहारी वाजपेयी हे स्वातंत्र्याच्या चार दशकानंतर पहिल्यांदाच काँग्रेस-विरोधी पक्षाचे पंतप्रधान बनले. पण बहुमत सिद्ध न करता आल्यानं ते केवळ १३ दिवसच पंतप्रधान म्हणून कार्यरत राहिले. १९९८ साली दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यावर ते पुन्हा एकदा पंतप्रधानाच्या खुर्चीवर विराजमान झाले. परंतु, एआयडीएमकेच्या सुप्रिमो जे जयललिता यांनी आपला पाठींबा काढून घेतल्यामुळे केवळ १३ महिने त्यांना पंतप्रधानपद अनुभवता आलं.  

१३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाचा मान मिळाला. ते नेहमी धाडसी निर्णय घेत असत. त्यांच्या कार्यकाळातच ११ मे १९९८ रोजी भारताने पोखरणची यशस्वी अणुचाचणी केली होती. सर्वसामान्यांच्या अनेक इच्छा आकांक्षा पुर्ण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.


'या' पुरस्काराने सन्मानित

अटल बिहारी वाजपेयी यांना १९९२ रोजी पद्मविभूषण, १९९४ साली लोकमान्य टिळक पुरस्कार तसेच उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार आणि २०१४ मध्ये भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाले.

धाडसी व्यक्तिमत्त्व

अटल बिहारी वाजपेयी यांचा शांत स्वभाव, कधीही कुठल्या कार्यामध्ये मागे न हटलेले धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख होती. अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती.


'या' आजाराने होते त्रस्त

वयाने थकलेले आणि दीर्घ आजराने ग्रासलेले वाजपेयी गेली बरीच वर्षे राजकारणापासू दूर होते. अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशिया नावाचा आजार झाला होता. डिमेंशिया या आजारमुळे स्मृतीभ्रंश होतो. यामध्ये वाढत्या वयानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होत जाते.

या आजारामुळे ११ जूनला त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून जवळपास ६६ दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्येच उपचार सुरू होते. बुधवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री एम्सने जारी केलेल्या बुलेटीननुसार, वाजपेयींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र प्रकृतीत कोणतीची सुधारणा झाली नाही. अखेर गुरुवारी त्यांचं निधन झालं. 



अटल बिहारी वाजपेयी एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

वाजपेयी यांची 'ही' ७ तडफदार भाषणं बघून तुम्हालाही जोश येईल!

'या' आहेत वाजपेयी यांच्या अजरामर कविता




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा