Advertisement

मुंबईची तुंबई करून दाखवली, दरेकरांचा शिवसेनेला टोला

मुंबईकर जर प्रत्येक वर्षी पाण्यात जाणार असतील, तर ३० ते ४० वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगून काय केलं, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला विचारला आहे.

मुंबईची तुंबई करून दाखवली, दरेकरांचा शिवसेनेला टोला
SHARES

‘आम्ही करून दाखवलं’ असे शहरभरात होर्डिंग्ज लावणाऱ्या शिवसेनेने मुंबईची तुंबई करून दाखवली. मुंबईकर जर प्रत्येक वर्षी पाण्यात जाणार असतील, तर ३० ते ४० वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगून काय केलं, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला विचारला आहे. (bjp leader pravin darekar criticised bmc and shiv sena over flood in mumbai)

मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचून मुंबईची तुंबई झाली. याची जबाबदारी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घ्यायला पाहिजे. पाऊस काय अचानक येतो का? पावसाळा संपल्यानंतर पुढचे ७ ते ८ महिने आपल्या हातात असतात. कुठल्या ठिकाणी पाणी तुंबतं हे मुंबईतली सगळी ठिकाणं ठाऊक आहे. पैशांची आपल्याला कमी नाही. पाहिजे ती मशिनरी आपण घेऊ शकतो. मुंबईकरांचे ५० हजार कोटी रुपये एफडीत आहेत. असं असूनही मुंबईकर जर प्रत्येक वर्षी पाण्यात जाणार असतील, तर ३० ते ४० वर्षे आपण महापालिकेत सत्ता उपभोगून काय केलं? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला.

हेही वाचा - मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा??

सत्ताधाऱ्यांचं मुंबई शहराकडे लक्ष नाहीय. थोडासा जरी पाऊस पडला, तरी अख्खी मुंबई प्रत्येकवेळी पाण्यात जाते. ही समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं नियोजन केलं जात नाही. केवळ वर वर कामं केली जातात. मुंबईकरांचा मूळ प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. केवळ करून दाखवल्याच्या बाता मारण्यातच हा सगळा वेळ खर्च केला जातो, असा टोमणा देखील प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला लगावला.

मुंबईत मंगळवारपासून तब्बल २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसाने २६ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सप्टेंबर महिन्यात २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच २४ तासांमध्ये मुंबईत एवढा पाऊस पडला आहे. १९९४ ते २०२० या कालावधीत सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा एका दिवसात मुंबईत इतका पाऊस पडला. त्याचबरोबर १९७४- २०२० दरम्यान सप्टेंबर महिन्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला जोरदार पाऊस बुधवार सकाळपर्यंत सुरुच होता. 

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. दरम्यान बुधवारीही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा