Advertisement

तर, खासदारकीचा राजीनामा देईन, उदयनराजेंचा इशारा

माझी बांधिलकी ही पक्षाशी नाही, तर लोकांशी आहे. केवळ मराठा समाजच नाही, तर इतर कुणावरही होणारा अन्याय दूर करण्यासाठी या पदाचा उपयोग होणार नसेल, तर असलं पद काय कामाचं, असं उदयनराजे म्हणाले.

तर, खासदारकीचा राजीनामा देईन, उदयनराजेंचा इशारा
SHARES

सरकार मराठा आरक्षण देत असेल, तर ठिक नाहीतर आपल्या खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशाराच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळत असताना केवळ मराठा समाजानेच वंचित का रहावं, असा प्रश्नही उदयनराजे यांनी उपस्थित केला. (bjp mp udayanraje bhosale warns to resign mp seat for maratha reservation)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला मराठा समाज आंदोलनाची तयारी करत असताना दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र सरकारने साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती जाहीर केल्याने मराठा समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडावी आणि आरक्षणावरील स्थगिती उठवावी, असं म्हणत राज्यातील विरोधी पक्ष देखील याप्रश्नी साथ द्यायला तयार आहे. 

त्यातच उदयनराजेंनी देखील आपली भूमिका मांडली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना उदयनराजे म्हणाले, कोणताही पक्ष हा लोकांच्या जीवावरच असतो. त्यामुळे माझी बांधिलकी ही पक्षाशी नाही, तर लोकांशी आहे. केवळ मराठा समाजच नाही, तर इतर कुणावरही होणारा अन्याय दूर करण्यासाठी या पदाचा उपयोग होणार नसेल, तर असलं पद काय कामाचं. म्हणूनच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याची वेळ आली, तर मी मागे हटणार नाही. 

माझी न्यायालयाचा अवमान करण्याची इच्छा नाही. परंतु न्यायालय म्हणजे काय हे मला अजूनपर्यंत कळालेलंच नाही. न्यायालयातही तुमच्या आमच्यासारखी माणसंच असतात. तेव्हा निर्णय देताना त्यांनी मनाने विचार केला पाहिजे. त्यांनी सर्वांना न्याय दिला पाहिजे, अशी अपेक्षा देखील उदयनराजे यांनी व्यक्त केली.  

हेही वाचा - Maratha Reservation: मराठा समाजाला भडकविण्याचं काम कुणी करू नये- उद्धव ठाकरे

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उभारलेल्या लढ्याचं नेतृत्व कुणीही करावं. माझ्यासाठी समस्या सुटणं हेच महत्त्वाचं आहे. या प्रश्नाचं राजकारण होऊ नये, मराठा समाजाला न्याय मिळणार नसेल, तर उद्रेक होणारच. जिथं अन्याय होत असेल, त्या अन्यायाविरूद्ध लढायला मी देखील उतरेल, असंही उदयनराजे यांनी सांगितलं.  

“मराठा आरक्षणावरुन माझी अनेकांशी चर्चा सुरु असून यामध्ये राजकारण आणलं जाऊ नये. इतरांप्रमाणे मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. ओघाने मी मराठा आहे, पण मला तेवढ्यापुरतं मर्यादित ठेऊ नका,” अशी विनंती उदयनराजेंनी केली आहे. “आरक्षण नाही मिळालं तर उद्रेक होईल याची जास्त भीती वाटते,” असं ते म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणासंबंधीत याचिकांवर बुधवार ९ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी सध्या (सन २०२०-२०२१) मराठा आरक्षण लागू करता येणार नाही. मात्र, याआधी देण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेशांमध्ये बदल करण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. शिवाय या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय देखील न्यायालयाने दिला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा