Advertisement

खडसे, मुडेंना पुन्हा डावललं, भाजपने केली विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ४ उमेदवारांच्या नावांची शुक्रवार ८ मे रोजी घोषणा केली.

खडसे, मुडेंना पुन्हा डावललं, भाजपने केली विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा
SHARES

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ४ उमेदवारांच्या नावांची शुक्रवार ८ मे रोजी घोषणा केली. यामध्ये भाजपने डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजित सिंग मोहिते यांना संधी दिली आहे. येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ मे आहे. २४ एप्रिल रोजी होणारी ही निवडणूक कोरोना संकटामुळे पुढं ढकलण्यात आली होती.

संधी नाकारली

विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे तसंच प्रकाश मेहता विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून शर्यतीत होते. आपापल्या परीने हे सर्वच नेते वरीष्ठ पातळीवर प्रयत्नशील होते. परंतु महाराष्ट्र भाजपचे चेहरे असलेल्या या नेत्यांना संधी नाकारुन पुन्हा एकदा डावलण्यात आल्याचं या उमेदवारीवरून दिसून आलं.

हेही वाचा - विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंचं नाव निश्चित

नवीन चेहरे 

एवढंच नाही, तर भाजपने डॉ. अजित गोपचडे आणि प्रवीण दटके ओबीसी नेते, गोपीचंद पडळकर धनगर नेते, तर रणजितसिंह मोहिते पाटील मराठा नेते असा जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्नही उमेदवारी देताना केल्याचं स्पष्ट होत आहे. 

असं आहे गणित

विधान परिषदेत रिक्त झालेल्या ९ जागांपैकी भाजपच्या ३, राष्ट्रवादी ३, काँग्रेस २ आणि शिवसेना १ अशा जागेचा समावेश आहे. विधानसभेत निवडून आलेले २८८ आमदार या ९ जागांसाठी मतदान करतील. ३२ आमदारांच्या मागे १ आमदार असं हे गणित आहे. भाजपने चौथा उमेदवार रिंगणात उतरून निवडणुकीची रंगत वाढवली आहे. एकूण पक्षीय बलाबल पाहता भाजपला त्यांची चौथी आणि महाविकास आघाडीला त्यांची सहावी जागा निवडून आणण्यासाठी कंबर कसावी लागेल.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवणं भाजपसाठी फायद्याचं की धोक्याचं?

मुख्यमंत्री रिंगणात

शिवसेनेने देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांच्या रुपाने आपले २ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. परंतु अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा शिल्लक आहे. त्यानंतरच या निवडणुकीतील चुरस खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा