Advertisement

Bird flu: अंडी-चिकन खाणाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला!

राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी चिकन-अंडी खाणाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सोबतच राज्यातील जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे.

Bird flu: अंडी-चिकन खाणाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला!
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) कोरोना संकटाच्या पाठोपाठ आता बर्ड फ्यूच्या संकटानेही शिरकाव केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी चिकन-अंडी खाणाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सोबतच राज्यातील जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनिल केदार यांनी सांगितलं की, अंडी किंवा कोंबडीचं मांस अर्धा तास विशिष्ट तापमाणावर शिजवल्यानंतर त्यातील जीवाणू मरून जातात, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे चिकन किंवा अंड्याचे पदार्थ खाणाऱ्यांनी हे पदार्थ ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून नंतरच खावेत. जेणेकरून कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाही. 

दरम्यान मुंबईत चिकनच्या किंमती १० ते २० रुपयांनी (प्रती किलो) घटल्या आहेत. या किंमतीसंदर्भातील अहवाल शनिवारी, ९ जानेवारी, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामागील कारण ग्राहकांची भीती असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या भीतीमुळे लोक पोल्ट्री मांस आणि उत्पादनांपासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. या आधारावरच व्यावसायिकांकडून पक्ष्यांची विल्हेवाट लावली जात आहे.

हेही वाचा- 'बर्ड फ्लू'बाबत अफवा पसरवू नका!, चिकन, अंड्यांच्या विक्रीवर अद्याप निर्बंध नाहीच

परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला सर्व प्रकारचे खबरदारीचे आदेश देण्यात आले आहेत. या विषाणूचा पुढे प्रसार होऊ नये यासाठी तातडीच्या उपाययोजना देखील करण्यात येत आहेत. अजून, मुंबई, ठाणे, दापोली, नागपूर येथील नमुन्याचा तपासणी अहवाल येणं बाकी आहे. त्यानंतरच बर्ड फ्लूचा कितपत प्रसार झाला आहे, हे सांगता येईल, अशी माहिती सुनिल केदार यांनी दिली. 

बर्ड फ्लूच्या संभाव्या धोक्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) सोमवारी सायंकाळी ५ वाजता ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल.

बर्ड फ्लूचे नमुने तपासण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली पाहिजे. जेणेकरून प्रत्येकवेळी भोपाळला नमुने तपासण्यासाठी देण्याची गरज पडणार नाही. या आधी २००६ मध्ये देखील महाराष्ट्राने बर्ड फ्लूची साथ अनुभवलेली आहे.  त्यावेळी देखील राज्य शासानाने केंद्र सरकारची वाट न पाहता, राज्यातील पोल्ट्री उद्योगास मदतीचा हात दिला होता. तशीच सहकार्याची भूमिका राज्य सरकारची असेल, असं देखील सुनिल केदार यांनी स्पष्ट केलं.

(chicken and egg eaters must take a precaution ahead of bird flu infection says maharashtra minister sunil kedar)

हेही वाचा- मुंबईत चिकनच्या किंमतीत १० ते २० रुपयांची घसरण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा