Advertisement

रश्मी ठाकरे, वरूण देसाईंविरोधातही तक्रार

सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईं यांच्याविरोधात देखील भाजपकडून ठिकठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

रश्मी ठाकरे, वरूण देसाईंविरोधातही तक्रार
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी तसंच सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईं यांच्याविरोधात देखील भाजपकडून ठिकठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये बुधवारी (२५ ऑगस्ट) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते. हे शब्द राणेंना संविधानानुसार देण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री पदाचा अपमान करणारे असल्याचं म्हणत  शिवाजी निवृत्ती बारके यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्याविरोधात दाखल केली आहे. तक्रारीत नाशिक महापालिकेमधील शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांचंही नाव आहे. बोरस्ते यांनी या लेखाचं पोस्टर बनवून ते जागोजागी लावून राणेंची बदनामी केल्याप्रकरणी या दोघांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

याचप्रकारे युवा सेनेचे अध्यक्ष वरुण देसाई यांच्याविरोधात मुंबईतील नारायण राणे यांच्या घराबाहेर आंदोलन करून सामाजिक सुव्यवस्था धोक्यात आणणे. तसंच मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याचं फेसबुकवरुन लाइव्ह प्रक्षेपण केल्याप्रकरणी भादंवि कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करुन घेण्यात यावी अशी तक्रार भाजपच्या वतीने ऋषिकेश अहेर यांनी केली आहे.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचाही ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, योगींविरोधातील वक्तव्यावरून लक्ष्य

त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सुनील रघुनाथ केदार यांनी तक्रार दाखल केली आहे. 

२०१८ साली झालेल्या दसरा मेळाव्यात भाषण करताना “ते मुख्यमंत्री कसे होऊ शकतात? जर तो योगी असेल तर त्यांनी सर्व काही सोडून गुहेत बसावं, पण ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून स्वतःला योगी म्हणवत आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना त्यांनी चप्पल घातली होती. मला वाटलं की त्यांना त्याच चप्पलाने मारलं पाहिजे.”, असं वक्तव्य केलं होतं. योगी हे केवळ भाजपचे नेते किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नसून गोरखपूर मठाचे महंत असल्याने असं वक्तव्य करुन उद्धव ठाकरेंनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळेच उद्धव यांच्याविरोधात कलम १५३ अ (१), १५३ (ब), १८९, २९५ अ. ५०४, ५०५ (२) आणि ५०६ अंतर्गत तक्रार दाखल करावी असं म्हटलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा