Advertisement

'कमला मिल अग्निकांडाला मनपाच जबाबदार'


'कमला मिल अग्निकांडाला मनपाच जबाबदार'
SHARES

कमला मिलमधील हॉटेलला आग लागून 14 नागरिकांचा बळी जाण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार कारणीभूत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपालांकडे केली. या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवावी आणि आयुक्तांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी स्पष्ट मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.


अग्निशमन अहवालात असुरक्षित बांधकामाची नोंद

मुंबई शहरातील सर्व अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम आणि तिथे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची मुंबई महानगर पालिकेला संपूर्ण माहिती आहे. तरीही त्याविरूद्ध कारवाई केली जात नाही. आग लागलेल्या दोन्ही हॉटेल्समध्ये विनापरवाना हुक्का पार्लर चालविले जात होते. त्यांच्याकडे अनधिकृत व असुरक्षित बांधकाम करण्यात आलेले होते. ही बाब अग्निशमन विभागाच्या अहवालातही नमूद करण्यात आली आहे. याची इत्थंभूत माहिती काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिली. त्यामुळे कमला मिल कंपाऊंडमधील ‘मोजोस बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या दोन हॉटेल्सला आग लागून 14 निरपराध नागरिकांचा बळी जाण्याच्या घटनेसाठी मुंबई महानगर पालिका जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.


सीबीआय चौकशीची मागणी कायम

कमला मिल व साकीनाका येथील फरसाण मार्टची आग व त्याचप्रमाणे घाटकोपर व भेंडीबाजार येथील इमारत कोसळण्याच्या चार घटनांमध्ये तब्बल 76 बळी गेले आहेत. या मृत्युंसाठी केवळ पालिकेचा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याने आयुक्तांसह सर्वच दोषी अधिकाऱ्यांवर भादंविच्या 302 कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली. तसेच, या घटनेची चौकशी सीबीआयला सोपविण्याबाबत आपण राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांकडे केली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा