Advertisement

राजभवनचं आरएसएस शाखा असं नामकरण करावं का?

राजभवनचं नामकरण भाजप कार्यालय किंवा आरएसएस का करू नये? असा प्रश्न काँग्रेस नेते आणि माजी आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.

राजभवनचं आरएसएस शाखा असं नामकरण करावं का?
SHARES

राज्य सरकार वा सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी वाद ओढावून घेणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भाजप नेत्यांसमवेत आवर्जून भेट देत असल्याने राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनचं नामकरण भाजप कार्यालय किंवा आरएसएस का करू नये? असा प्रश्न काँग्रेस नेते आणि माजी आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. (congress leader bhai jagtap compares maharashtra raj bhavan with bjp and rss office)

राज्य सरकारच्या अनेक निर्णयांवर आक्षेप घेणारे भाजप नेते वारंवार राजभवन इथं जाऊन राज्यपालांची भेट घेताना मागील काही महिन्यांपासून सातत्याने दिसत आहेत. मग तो विधान परिषदेच्या निवडणुकांचा विषय असो, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा असो किंवा अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करण्याचा विषय असो, राज्यपालांनी निर्देश देऊन सरकारवर दबाव आणावा यासाठी भाजप नेते सातत्याने प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच कंगना रणौत वाद आणि माजी नौदल अधिकाऱ्याला झालेली मारहाण यामुळे सरकारवर सर्वच स्तरावरून टीका होत आहे. भाजपने हा मुद्दाही उचलून धरत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हेही वाचा - आता भाजप-संघासाठी काम करणार, ‘त्या’ माजी नौदल अधिकाऱ्याचा इरादा

शिवसेनेशी झालेला वाद आणि मुंबई महापालिकेने कार्यालयावर केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौतने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी तिच्याशी सुमारे २० मिनिटं चर्चा केली. गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने मला वागणूक दिली गेली. त्याची संपूर्ण माहिती मी राज्यपालांनी दिली. राज्यपालांनीही मुलीप्रमाणे माझं म्हणणं ऐकून घेत मला अश्वस्त केलं. माझ्यावर अन्याय झाला असून मला न्याय मिळायला हवा. मला न्याय देऊन न्यायव्यवस्थेवरील महिलांचा विश्वास वाढवायला हवा, अशी कैफियत राज्यपालांकडे मांडल्याचं कंगना प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाली. यावेळी कंगनासोबत तिची बहीणही होती. 

त्यापाठोपाठ शिवसैनिकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनाक्रमाबाबत निवेदन देण्यासाठी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी निवृत्त जवानांच्या शिष्टमंडळासोबत राज्यपालांची राजभवन इथं भेट घेतली. यावेळी शर्मा यांनी यापुढे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करणार असून राज्यात गुंडगिरी खपवून घेणार नाही, असं म्हटलं. शिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही राज्यपालांकडे केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. 

त्याआधी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

त्यावर टोमणा मारताना महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस शाखा किंवा भाजपा कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का? असा प्रश्न काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - मिम्स शेअर करत कंगनाकडून मुख्यमंत्र्यांना रावणाची उपमा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा