Advertisement

आम्ही आघाडीसोबतच, सामनाने नीट माहिती घेऊन लिहावं- बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडीत काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी आम्ही आघाडीसोबतच आहोत. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं समाधान होईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

आम्ही आघाडीसोबतच, सामनाने नीट माहिती घेऊन लिहावं- बाळासाहेब थोरात
SHARES

महाविकास आघाडीत काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी आम्ही आघाडीसोबतच आहोत. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं समाधान होईल. सामनाने व्यवस्थित माहिती घेऊन लिखाण करावं, अशी अपेक्षा आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिका मांडली आहे. 

सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेते नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसच्या नाराजीमागे नेमकं काय कारण आहे? याविषयी देखील तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात काँग्रेसच्या नाराजीला कारणीभूत असलेल्या मुद्द्यांवरुन बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोघांनाही चिमटा काढण्यात आला आहे.

खरं तर मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असून देखील निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याची काँग्रेस नेत्यांची मुख्य तक्रार आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना निधी वाटपात झुकतं माप मिळत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहत यांना मुदतवाढ मिळू नये, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. त्यातच विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ जागांमध्ये तिन्ही पक्षांना समान ४ जागा मिळाव्यात, असा काँग्रेसचा आग्रह आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे. 

हेही वाचा - खाट का कुरकुरतेय? शिवसेनेचा काँग्रेसला चिमटा

त्यावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करताना संजय राऊत यांनी म्हटलं की, आघाडीच्या सरकारात अधूनमधून असं कुरकुरणं सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणंही तसं संयमी असतं. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथं तर तीन पक्षांचं सरकार आहे. थोडंफार कुरकुरणं होणारच. ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू,’ असं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली व तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितलं की, ‘‘सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये जरा आमचंही ऐका. प्रशासनातील अधिकारी म्हणजे नोकरशाही वाद निर्माण करीत आहे. आम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशीच बोलू.

काँग्रेसच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यानंतर अखेर त्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडलं आहे. ते म्हणाले की, आम्ही आघाडीसोबत आहोत, आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडू, आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्र्यांचं समाधान होईल, सामनाने व्यवस्थित माहिती घेऊन लिखाण करावं अशी अपेक्षा देखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा