Advertisement

आई सांभाळत नाही, म्हणून ‘ते’ मावशीकडे येतात, थोरातांचा योगींना टोला

आदित्यनाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की, उत्तर प्रदेशमध्ये ते आणि त्यांचं सरकार रोजगार निर्माण करू शकले नाही. तेथील मजूर महाराष्ट्रात येताहेत, कारण आईने सांभाळलं नाही म्हणून मावशीकडे येताहेत.

आई सांभाळत नाही, म्हणून ‘ते’ मावशीकडे येतात, थोरातांचा योगींना टोला
SHARES

उत्तर प्रदेशातील सत्ताधारी स्थानिकांना रोजगार देण्यात अपयशी ठरले. त्यामुळे हे सर्व मजूर (uttar pradesh migrant workers ) महाराष्ट्रात आले. आई सांभाळत नाही म्हणूनच ते मावशीकडे येतात. महाराष्ट्रानेही मागच्या २ महिन्यापासून त्यांना स्वखर्चाने अत्यंत व्यवस्थित सांभाळलं. हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समजून घ्यावं, असा टोला राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (congress leader balasaheb thorat) यांनी लगावला. 

उत्तर प्रदेशातील कामगार (workers in up) हवे असतील, तर उत्तर प्रदेश सरकारची (up government) त्यासाठी परवानगी लागेल, असं वक्तव्य नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (up cm yogi adityanath) यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी हे वक्तव्य केलं. 

ते म्हणाले, योगी आदित्यनाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की, उत्तर प्रदेशमध्ये ते आणि त्यांचं सरकार रोजगार निर्माण करू शकले नाही. तेथील मजूर महाराष्ट्रात येताहेत, कारण आईने सांभाळलं नाही म्हणून मावशीकडे येताहेत. 

हेही वाचा - तर महाराष्ट्रात येण्याआधी, 'हे'सुद्धा लक्षात ठेवा… राज ठाकरेंचं योगींना सडेतोड प्रत्युत्तर

२ महिने कोणी सांभाळलं?

आपण सगळ्यांनीच बघितलं की मागील २ महिन्यांच्या कालावधीत या परप्रांतीय मजुरांना कुठलंही उत्पन्न नव्हतं, पगार मिळत नव्हता, अशा परिस्थितीत त्यांना कोणी सांभाळलं? तर त्यांना महाराष्ट्र सरकारने सांभाळलं, आपल्या स्वयंसेवी संस्था, पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांभाळलं. अत्यंत आनंदाने कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळलं. त्यांना घराकडे जाण्याची इच्छा झाल्यावर त्यांना सन्मानाने पाठवत आहोत. त्यांच्या तिकीटाचा खर्च महाराष्ट्र सरकार करत आहेत. त्यापोटी आतापर्यंत १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ट्रेनमध्येही त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करून सन्मानाने पाठवलं जात आहे. 

तिथली अवस्था काय?

 हाच मजूर तिथं गेल्यावर काय म्हणतो हे आवर्जून ऐकायला पाहिजे. तो म्हणून की महाराष्ट्रात सन्मान मिळत होता. पण आज इथं प्यायला पाणी आणि लहान मुलांना साधं दूध देखील मिळत नाही, हे आदित्यनाथ यांनी समजून घेतलं पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

याआधी योगींवर हल्लाबोल करताना यापुढे महाराष्ट्रात येतानाही महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय कामगारांना येता येणार नाही हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी सुनावलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा