अभासेसमोर दोन्ही जागा राखण्याचं आव्हान

  Pali Hill
  अभासेसमोर दोन्ही जागा राखण्याचं आव्हान
  मुंबई  -  

  मुंबई - भायखळा विधानसभा क्षेत्रातील आपल्या दोन्ही जागा राखण्याचं आव्हान अखिल भारतीय सेना (अभासे) च्या दोन्ही नगरसेवकांपुढे आहे. गीता गवळी आणि वंदना गवळी या अभासेच्या दोन नगरसेविका असून या दोघीही तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरत आहेत. परंतु या दोन्ही नगरसेविकांसमोर यंदा मदतीचा हात पुढे करण्याबाबत शिवसेनेकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे या नगरसेविकांना हॅट्ट्रिक साधताना पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवणं आव्हानात्मक ठरणार आहे.

  अभासेच्या गीता गवळी आणि वंदना गवळी यांचे नव्या प्रभाग फेररचनेत अनुक्रमे 212 आणि 207 हे प्रभाग झाले असून या दोन्ही प्रभागातून पक्षाच्यावतीने गवळी कुटुंबीय उभे राहणार आहे. 2007 मध्ये प्रथमच निवडून आलेल्या या अभासेच्या दोन्ही नगरसेविकांनी शिवेसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे 2012च्या सार्वत्रिक निवडणुकीत या दोघींसमोर रिपाइंचे उमेदवार दिल्याने या निवडणुकीत दोघींचा विजय सुकर झाला आणि त्या पुन्हा शिवसेनेसोबतच राहिल्या. मात्र आता राजकीय समीकरणे बदलल्यामुळे या दोघींनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी अभासेच्या वतीनेच निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.

  प्रभाग क्रमांक 212 मधून गीता गवळी निवडणूक लढवणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे नगरसेवक फय्याज अहमद खान यांच्या पत्नी तसेच एमआयएम आणि सपाच्या उमेदवारांचं आव्हान गीता गवळींसमोर असणार आहे. तर प्रभाग 207 मधून वंदना गवळी या निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, शिवसेना शाखाप्रमुख काका चव्हाण यांच्या पत्नी यांसह काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवार आहेत. त्यामुळे या दोन्ही अभासेच्या उमेदवारांसमोर यंदा कडवे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.