‘सनातन’वर बंदी घाला, हुसेन दलवाई यांची मागणी

‘सनातन’ संस्थेवर ताबडतोब बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी ​मुख्यमंत्री उद्धव ठाकरे​​​ यांच्याकडे केली आहे.

SHARE

डाॅ. नरेंद्र दाभोलकर तसंच काॅ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत ‘सनातन’ संस्थेचा सहभाग असल्याचा आरोप करत ‘सनातन’ संस्थेवर ताबडतोब बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना दलवाई म्हणाले, सनातन संस्था महाराष्ट्रात दहशतवाद पसरवत आहे. नवं सरकार पुरोगामी सरकार असून ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि राज्यात शांतता नांदावी म्हणून काम करत आहे. शिवसेनेने ‘सनातन’ संस्थेला कधीच पाठिंबा दिला नाही. आघाडी सरकारच्या काळात या संस्थेवर कारवाई करण्याची अंमलबजावणी झाली नाही, ही आमची चूक होती. परंतु आता अशा संस्थांवर कारवाई झालीच पाहिजे.

हेही वाचा- मागच्या मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ प्रकल्पही गोत्यात?

डाॅ. दाभोलकर, काॅ. पानसरे यांच्यासारखी माणसं मारली जात आहेत. ‘सनातन’ संस्थेतील लोकांची वक्तव्य तपासली तर त्यांच्या हत्येत कुणाचा सहभाग होता, हे उघड होतं. मालेगाव बाॅम्बस्फोट आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला भाजपकडून खासदारकी दिली जाते, हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. दहशतवाद पसरवणार कुठल्याही जाती-धर्माचा का असेना त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं दलवाई यांनी सांगितलं.

भीमा कोरेगाव प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलं की या आंदोलनात आंदोलनकर्त्यांना नाहक गोवण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग होता. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मागील वेळेस भिडे यांची बाजू घेतली होती. परंतु त्यांनी आता त्यांची बाजू घेऊ नये, उलट त्यांच्यावर कारवाई करावी, हेच मी त्यांना आताही सांगेन, असं दलवाई म्हणाले.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या