शिवसेनेच्या आमदारांवर अविश्वास? विधानपरिषद पोटनिवडणुकीत नार्वेकर पोलिंग एजंट

  Vidhan Bhavan
  शिवसेनेच्या आमदारांवर अविश्वास? विधानपरिषद पोटनिवडणुकीत नार्वेकर पोलिंग एजंट
  मुंबई  -  

  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी गुरूवारी सकाळी ९ वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानाला सुरूवात झाली. भाजपा युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस अाघाडीचे दिलीप माने यांच्यात ही सरळ लढत होत असून ४ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. या निवडणुकीत लाड यांचं पारडं जड मानलं जात असलं, तरी ऐन वेळी दगाबाजी होऊ नये म्हणून आमदारांवर नजर ठेवण्यासाठी खास पोलिंग एजंटची नेमणूक करण्यात आली आहे. या पोलिंग एजंटचं नाव आहे, मिलिंद नार्वेकर. नार्वेकर यांच्या उपस्थितीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा स्वत:च्या पक्षातील आमदारांवर विश्वास नसल्याचं दिसून येत आहे.


  नार्वेकर का बनले पोलिंग एजंट?

  मातोश्रीचा सीसीटीव्ही अर्थात मिलिंद नार्वेकर शिवसेनेची मते फुटू नयेत म्हणून मतदान केंद्रात प्रसाद लाड यांच्या बाजूला बसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. दोन्ही पक्षांना एकमेकांवर अविश्वास असल्यामुळे मिलिंद नार्वेकर आणि गिरीश बापट यांना पोलिंग बूथवर बसावं लागल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.


  मंत्री, आमदारांनी बजावला हक्क

  सकाळी मतदानाला सुरूवात होताच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना, भाजप आणि अपक्ष आमदारांनी सकाळीच मतदानासाठी विधानभवनात गर्दी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी व इतर पक्षाचे आमदारही मतदानासाठी विधानभवनात हजर आहेत. बहुतेक मंत्री, आमदारांनी मतदान केलं आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून, सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.


  मिलिंद नार्वेकर प्रसाद लाड यांच्या विनंतीमुळेच पोलिंग एजंटचं काम करताहेत.
  शिवसेनेत कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. शिवसेनेत पक्ष प्रमुखांच्या आदेशाचं पालन होतं. शिवसेनेचं एकही मत फुटणार नाही.

  - एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री


  भाजपा-शिवसेनेत अविश्वासाचं वातावरण नाही. युतीचा उमेदवार असल्यानं मिलिंद नार्वेकर हे पोलिंग एजंट म्हणून काम करत आहेत. आम्हाला २२५ मतं मिळतील.

  - रावसाहेब दानवे, भाजपा प्रदेशाध्यक्ष


  विधानसभेतील पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे-

  भाजप-१२२ , शिवसेना-६३,काँग्रेस-४२, राष्ट्रवादी-४१, शेकाप-३, बविआ-३, एमआयएम-२, अपक्ष-७, सपा-१, मनसे-१, रासपा-१, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया-१-भारिप-१  हेही वाचा-

  विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रसाद लाड यांचे पारडे जड, गुरुवारी मतदान

  युतीच्या आमदारांना ताज हाॅटेलमध्ये 'लाडांचा प्रसाद'

  निष्ठावंतांना डावलून प्रसाद लाड यांना भाजपाची उमेदवारी


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.