Advertisement

शिवसेनेशी पंगा सोमय्यांच्या अंगलट; ईशान्य मुंबईसाठी मनोज कोटकांची वर्णी

ईशान्य मुंबईसाठी मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

शिवसेनेशी पंगा सोमय्यांच्या अंगलट; ईशान्य मुंबईसाठी मनोज कोटकांची वर्णी
SHARES

ईशान्य मुंबईसाठी मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. कोटक यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर शिवसेनेशी घेतलेला पंगा सोमय्यांच्या अंगलट आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


शिवसेनेचा विरोध

ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध होता. सोमय्या यांनी अनेकदा शिवसेनेवर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या नावाला शिवसेनेकडून विरोध करण्यात येत होता. तसंच किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना आपला उमेदवार त्यांच्या विरोधात उभा करेल, असा इशाराही शिवसेनेनं भाजपला दिला होता. किरीट सोमय्यांना तिकीट देण्यात आल्यास त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं सुनील राऊत यांनी म्हटलं होतं. 'वेळ पडल्यास अपक्ष लढू पण मी सोमय्यांविरोधात निवडणूक लढवणारच,' असा निर्धार राऊत यांनी बोलून दाखवला. त्यामुळे किरीट सोमय्यांची डोकेदुखी वाढली होती.


नावांची चाचपणी

गेल्या अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सुटत नव्हता. तसंच सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध असल्यामुळं त्या ठिकाणी उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू होती. या ठिकाणी उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या मनोज कोटक यांच्या नावाचीही चर्चा होती. अखेर बुधवारी मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्यामुळं आता ते काय भूमिका घेतील हे आता पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


आठवलेही उत्सुक

ईशान्य मुंबईच्या जागेसाठी खा. रामदास आठवले हेदेखील उत्सुक होते. तसंच त्यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली होती. याव्यतिरिक्त त्यांनी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यामुळं ही जागा रिपाइंसाठी सोडण्याचीही मागणी केली होती.


सोमय्यांकडून प्रयत्न

जागावाटपात ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपाकडे असला तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक असल्यानं शिवसेनेच्या मर्जीशिवाय येथे उमेदवार देता येणार नाही याची भाजपाला होती. तसंच शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांनी प्रयत्नदेखील केले होते. परंतु त्यांना मातोश्रीवरून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांचे प्रयत्न फोल ठरले. तसंच त्यांनी अन्य मार्गांनीही मातोश्रीवर पोहोचण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता.


कोण आहेत कोटक ?

मनोज कोटक हे मुंबई महापालिकेतील भाजपाचे विद्यमान नगरसेवक असून ते भाजपाचे महापालिकेतील गटनेतेदेखील आहेत. तसंच ते मुलुंडमधून निवडून आले आहेत. मनोज कोटक यांचा मुलुंड आणि भांडुप परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळंच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाल्यानं आता ईशान्य मुंबईतून मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यात यांच्यात निवडणुकीचा सामना रंगणार आहे.


हेही वाचा -

धनंजय मुंडेंच्या बंगल्याचा गैरवापर, राष्ट्रवादीविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

शिवसेनेकडून जैनांचा अपमान; मिलिंद देवरा यांचा आरोप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा