Advertisement

कोरोनाला सणवार कळत नाही, दिवाळी जपून साजरी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या; पण आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवा, असं आवाहन राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे.

कोरोनाला सणवार कळत नाही, दिवाळी जपून साजरी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला
SHARES

कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या; पण आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवा, असं आवाहन राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे. सोबतच दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 

जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितलं की, कोरोनावरील लस येईपर्यंत आणि ती आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत स्वत:ला तसंच इतरांना सुरक्षित ठेवणं हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे. गेल्या ७ ते ८ महिन्यात आपण सर्वधर्मीयांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचं पालन करून साजरे केले आहेत. आपल्या संयमामुळेच इतक्या महिन्यानंतरही आपण कोरोनाला रोखून धरण्यात यशस्वी झालो आहोत.

युरोपातील काही देशांत कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. त्याठिकाणी रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांच्यासाठी रुग्णालयांची साधनसामग्री, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स कमी पडत आहेत.त्यामुळे दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान बनेल हे ध्यानी घ्या, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधलं.

हेही वाचा- कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!- उद्धव ठाकरे

एकीकडे आपण दिवाळीचा आनंद घेणार असलो, तरी दुसरीकडे हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी (coronavirus) लढताहेत, तुमचा -आपला सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत, हे कृपया विसरू नका एवढीच विनंती. त्यांची दिवाळी रुग्णालयांमध्ये आणि कर्तव्य बजावताना जाणार आहे. या कर्मचाऱ्यांत आपली आई, वडील, भाऊ बहीण, नातेवाईक, मित्र कुणीही असू शकते. त्यांच्यावरचा ताण न वाढू देणं आणि घरातच राहून सुरक्षितरित्या दिवाळी साजरी करणं याला प्राधान्य द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु करायची आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे या दिवाळीतही मास्क घालणं- हात धुणं- अंतर पाळणं ही त्रिसूत्री पाळा आणि आता हिवाळा असल्याने श्वसन रोगाला आमंत्रण देऊ नका, आपले आई वडील, ज्येष्ठ मंडळी घरात आहेत याची जाणीव ठेवा. फटाके वाजविणे आणि बाहेरच्या भेटीगाठी यापेक्षा घरातच कुटुंब एकत्रितरीत्या  हा सण साजरा करू शकते. 

हा दीपोत्सव असल्याने दिव्यांची आरास, रांगोळ्या, ज्यांना शक्य आहे त्यांना अंगणात किल्ले करणे, या काळात सुट्या असल्याने वाचन करणं, संगीत तसंच इतर आवड पूर्ण करा. तुमच्या घराचे दरवाजे मंगलमय शांती, समृद्धी, लक्ष्मी यांच्यासाठी उघडा, कोरोनासारख्या रोगासाठी नव्हे, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(maharashtra cm uddhav thackeray urges people to celebrate diwali in simple way)

हेही वाचा- दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे- उद्धव ठाकरे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा