Advertisement

‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार- अजित पवार

राज्यातील ‘ओबीसी’ समाजाच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यावर राज्य सरकार ठाम आहे, असं अजित पवार म्हणाले.

‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार- अजित पवार
SHARES

राज्यातील ‘ओबीसी’ समाजाच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यावर राज्य सरकार ठाम आहे. त्यासाठी सर्वशक्तिनिशी प्रयत्न सुरु असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केलं.

महाराष्ट्र विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी राज्य सरकार आपली पूर्ण शक्ती पणाला लावेल आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देईल. परंतु असं करत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू दिला जाणार नाही, कुण्याच्याही वाटेचं काढून कुणालाही दिलं जाणार नाही. तर प्रत्येकाच्या हक्काचं प्रत्येकाला देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

याआधी विधानसभेतील सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आमच्या काळात मराठा आरक्षणावर स्थगितीची वेळ येऊ दिली नाही. परंतु आता हे प्रकरण घटनापीठाकडे गेल्यावरही मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम आहे. राज्य सरकारला आरक्षणावरील स्थगिती उठवण्यात आलेल्या अपयशामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. न्यायालयाने विचारलेलं नसतानाही ‘आ बैल मुझे मार..’ म्हणत आम्ही भरती करणार नसल्याचं सरकारने सांगून टाकलं. यामुळे नोकऱ्या मिळालेल्या मराठा तरूणांवरही घरी बसण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा- आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू, भाजपचा इशारा

आमच्या काळात देखील मराठा आरक्षणासाठी आंदोलन, मोर्चे झाले. पण कधी कोणाला अटक नाही झाली. कोणाला मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका असं झालं नाही. आज तर एका प्रकारे आणीबाणीच लागली आहे. मराठा समन्वयकांना अटक होते, मुंबईत येऊ नका असे आदेश काढले जातात. एका बाजूला चर्चाही करायची नाही आणि दुसरीकडे आंदोलन देखील करायचं नाही, अशा सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजात संताप निर्माण होत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारमधील मंत्रीच घटनाबाह्य पद्धतीने मोर्चे काढत असल्याचं दिसत आहे. मेळावे घेत आहेत. सरकारी पक्षातील नेतेच विरोधी भूमिका घेत तेढ निर्माण करणार असतील तर कायदा सुव्यवस्था कशी टीकेल?  ओबीसी आरक्षणात कोणालाही वाटेकरी करणार नाही हे मंत्रीमंडळात सांगायची गरज आहे, तसा ठराव घ्या, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

(maharashtra deputy cm ajit pawar replies on maratha and obc reservation in assembly winter session)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा