Advertisement

भाजपला सरकार स्थापनेचं निमंत्रण, पण बहुमताचा आकडा कसा गाठणार?


भाजपला सरकार स्थापनेचं निमंत्रण, पण बहुमताचा आकडा कसा गाठणार?
SHARES

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. राज्यपालांकडून निमंत्रण मिळालं असलं, तरी सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुमताचा आकडा कसा गाठणार? ही चिंता भाजपपुढं उभी ठाकली आहे.

राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या आमंत्रणावर निर्णय घेण्यासाठी राज्य भाजप कोअर कमिटीची बैठक बोलवली असून या बैठकीतच निर्णय घेण्यात येईल. भाजपने विरोधी पक्षात बसण्याबाबतही चर्चा झाली असून त्याबाबत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनाही कळवण्यात आल्याचं समजतं. या माध्यमातून भाजपनं शिवसेनेला एक प्रकारचा अल्टीमेटम दिल्याचीही चर्चा आहे.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पद सांभाळण्याची सूचना राज्यपालांनी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर अडून बसलेल्या शिवसेनेवर फडणवीस यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. माझ्यासमोर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा विषयच झाला नसल्याचं सांगून अमित शहा आणि नितीन गडकरी यांनीही त्याला दुजोरा दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. 

तर, फडणीस यांच्या वक्तव्यानंतर तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर लावण्यात येणारे खोटारडेपणाचे आरोप कधीही मान्य करणार नाही, असं ठणकावून सांगितलं. अमित शहा आणि फडणवीस यांच्यासमोर हा विषय झाला असून ते जाणीवपूर्वक या विषयाला बगल देत आहेत. त्यामुळे अशा खोटारड्या लोकांबरोबर यापुढं संबंध ठेवणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्यानंतर रविवारी नियमानुसार राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करत ११ नोव्हेंबर रात्री ८ वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याची मुदत दिली आहे. १०५ जागा असलेली भाजप बहुमताचा १४५ आकडा कसा गाठते की ५६ जागा मिळालेली शिवसेना सत्तास्थापनेसाठी वेगळे डावपेच लढते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 



हेही वाचा-

काळजीवाहू सरकार किती दिवस? महाराष्ट्राला खरी 'काळजी' राष्ट्रपती राजवटीची!

शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी मला शहा, फडणवीस यांची गरज नाही- उद्धव ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा