Advertisement

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं प्लाझ्मा दान

कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केलं.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं प्लाझ्मा दान
SHARES

कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केलं. कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावं; जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असं आवाहन आव्हाड यांनी यावेळी केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा (शहर)चे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील कोरोनावर मात केली असून त्यांनी देखील आव्हाड यांच्यासोबतच प्लाझ्मादान केलं.  

आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, मतदार संघात लोकसेवा करत असताना मला अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसात मी हाॅस्पीटलमध्ये जावून प्लाझ्मा डोनेट करणार आहे, अशी माहिती आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती.

जितेंद्र आव्हाड कोरोनाची लागण झालेले महाविकास आघाडी सरकारमधील पहिले मंत्री होते. त्यांच्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि राज्यमंत्री अब्दुल सुतार यांनाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं हाेतं. सुदैवाने यातील प्रत्येकाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.

हेही वाचा - नवी मुंबईत ४०२ आयसीयू बेड, १७३ व्हेंटिलेटर उपलब्ध होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डींग्ज लावू नये; त्याऐवजी कोविड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं.

गृहनिर्माणमंत्री डॉ. आव्हाड यावेळी म्हणाले जर कोरोनातून मुक्त झालेल्या प्रत्येक माणसाने प्लाझ्मा दान केला तर महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच आपण हे दान केलं आहे. आता इतर कोरोनाग्रस्तांना बरे करण्याची जबाबदारी आपली आहे. कोरोनामुक्त झालेल्या सर्वच रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान, ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला प्लाझ्मा स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. ठाणे-मुंबईमध्ये ६ ठिकाणीच प्लाझ्मा संकलन करण्यात येत होतं. मुंबईमध्ये ४ आणि नवी मुंबई, नालसोपाऱ्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे संकलन करण्यात येत होतं. परिणामी, वाहतुकीच्या समस्येमुळे ठाण्यातील रुग्णांना त्याचा लाभ घेणं जिकिरीचं होत होते. मात्र, आता ही समस्या निकाली निघाली आहे. ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला ही परवानगी मिळाली आहे. या रक्तपेढीमध्ये एकावेळी ३ जणांचे प्लाझ्मा संकलन करणं शक्य होणार असून किमान १०० जणांचा प्लाझ्मा साठवणं शक्य होणार आहे.

हेही वाचा - धारावीत देशातील पहिले प्लाझ्मा दान शिबीर

संबंधित विषय
Advertisement