Advertisement

बिहारच्या आखाड्यात महाराष्ट्र!

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी इ. सारखे महाराष्ट्रातल्या मातीतले पक्ष बिहारच्या आखाड्यात निवडणूक लढवण्यासाठी उतरले आहेत.

बिहारच्या आखाड्यात महाराष्ट्र!
SHARES

बिहारमधील विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलंय. विधानसभेच्या २४३ जागांसाठी इथं २८ आॅक्टोबरपासून एकूण ३ टप्प्यात मतदानात होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागेल. विविध राजकीय पक्षांमधील जागा वाटपाची बोलणी शेवटच्या टप्प्यावर आलेली असताना हळुहळू प्रचाराची रणनितीही ठरू लागलीय. या सगळ्या धामधुमीत महाराष्ट्रातील राजकीय हालचालींनीही जोर धरलाय. यामागचं कारण म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी इ. सारखे महाराष्ट्रातल्या मातीतले पक्ष बिहारच्या आखाड्यात निवडणूक लढवण्यासाठी उतरले आहेत. 

बिहारमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (जेडीयू+ भाजप+इ.) आणि संयुक्त पुरोगामी आघाडी (आरजेडी+काँग्रेस+इ.) अशा दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस अपेक्षित आहे. परंतु दिवंगत राम विलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने रालोआ सोबत न जाता वेगळं लढण्याचं ठरवलंय. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम अशा पक्षांनीही या आखाड्यात उडी घेतल्याने बिहारमधील निवडणुकीची रंगत वाढणार आहे.

सध्याच्या १६ व्या विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडकडे ६९ जागा असून भाजपकडे ५४ जागा आहेत. हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि ४ अपक्ष आमदारांचं पाठबळ मिळून रालोआ कडे एकूण १२८ जागा आहेत. तर विरोधी पक्षात असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे ७३, काँग्रेसकडे २३, सीपीआय ३ आणि अपक्ष १ मिळून संपुआकडे १०३ जागा आहेत. तसं बघायला गेल्यास जागांमधील हे अंतर फारसं नाही. 

केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचं निधन झाल्याने त्यांचे चरंजीव चिराग पासवान यांच्या हाती लोकजनशक्ती पक्षाची धुरा आलीय. जागा वाटपावरून बिनसल्याने चिराग यांनी भाजपसोबत न जाता वेगळं लढण्याचं ठरवलंय. वडिलांच्या मृत्यूमुळे यांच्या पक्षाला सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो, असा तेथील राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला चाईबासा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्याकडे मतदारांचं लक्ष वेधलं गेलंय. सध्या त्यांच्या पक्षाची धुरा पूत्र तेजस्वी यादव सांभाळत असून लालू प्रसाद ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत तुरूंगाबाहेर आल्यास प्रचारातील गंमत वाढू शकते. काँग्रेसने या निवडणुकीत आणखी जोर लावण्याची आवश्यकता आहे. तसं झाल्यास सत्ताधाऱ्यांना तगडं आव्हान मिळू शकेल. 

महाराष्ट्रातून बिहारच्या राजकारणात उडी घेणाऱ्या बहुतेक सगळ्याच पक्षांची भूमिका शह-काटशहाच्या खेळीत निर्णायक ठरणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, तसंच लाॅकडाऊनमुळे रोजगाराविना अडकलेल्या परप्रांतीयांना महाराष्ट्र सरकारने संकट काळात मदतीचा हात दिला होता. ठिकठिकाणी परप्रांतीयांसाठी भोजन, निवास, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर केंद्राच्या परवानगीने विशेष श्रमिक ट्रेन आणि एसटीतून त्यांच्या प्रवासाची व्यवस्थाही केली होती. त्याचं परप्रांतीयांनी चांगलंच कौतुक केलं होतं. या परप्रांतीयांमध्ये बिहारी जनतेची संख्याही मोठी होती. सद्यस्थितीत काही बिहारी श्रमिक महाराष्ट्रात परतले असले, तरी बहुसंख्य मतदान करूनच परतण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे येथील श्रमिकांना महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित अशा पक्षांची चांगलीच ओळख आहे. 

त्यातच अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून झालेल्या राजकारणामुळे बिहारी मतदार आणखीनच सजग झालेत. भूमिपूत्र सुशांतच्या नावे सत्ताधाऱ्यांनी आपल्या पोळ्या भाजत स्थानिक मुद्द्यावरून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही हा मुद्दा सुरूच आहे. त्यामुळे भाजपने सुशांत प्रकरणावरून जनतेची किती फसवणूक केली, हा आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा तर असेलच परंतु बेरोजगारी, रखडलेला विकास, शिक्षण या मुद्द्यांवरून देखील सरकारला घेरणार असल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलंय. या निवडणुकीत शिवसेना ५० हून अधिक उमेदवार उतरवणार असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासोबत २० स्टार प्रचारकांच्या टीमची घोषणाही शिवसेनेने केलीय. 

त्याचपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह तब्बल ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत या निवडणुकीत जोमाने उतरणार असल्याचं स्पष्ट केलंय. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्समध्ये (पीडीए) सहभागी होत निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. तर रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षही बिहारमध्ये १५ जागा लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोबत अससुद्दीन ओवैसी यांची एमआयएम एकट्यानेच निवडणूक लढवत आहे. बिहारमध्ये मुस्लिम, आंबेडकरवादी, आदिवासी मिळून ४० टक्के जनता आहे. एवढी मोठी जनसंख्या मिळून कुठलंही सरकार आरामात पाडू शकते, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.

सन २०१५ मधील बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने २४३ जागांपैकी ८० जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेला २ लाख ११ हजार १३१ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १ लाख ८५ हजार ४३७ आणि एमआयएमला ८० हजार २४८ मते मिळाली होती. म्हणजेच या दोन्ही पक्षांपेक्षा शिवसेनेला जास्त मतं मिळाली होती. हयाघाट, बोचहा, दिनारा जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब आणि मोरवा अशा ७ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची, भमुआ आणि मनिहारी या २ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. एवढंच नाही, तर एकूण ३५ जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही जास्त मते मिळाली होती. यापैकी ३ जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजपच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चाखावी लागली होती.

उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या हासरथ प्रकरणामुळे शिवसेनेच्या हातात भाजपविरोधातलं आणखी एक अस्त्र सापडलं आहे. काँग्रेससहीत, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित इतर पक्षही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. त्यातही शिवसेनेचं हिंदुत्व हा देखील तिकडच्या मतदारांच्या आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे शिवसेना यंदाच्या निवडणुकीत कसं प्रदर्शन करते याकडं जाणकारांचं विशेष लक्ष लागलंय. 

भाजपने महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र-बिहारच्या मुद्द्यांवरून दोन्ही बाजूकडील नेतेमंडळीत जोरदार चकमकी उडताना नक्कीच दिसतील. 

बिहारमधील २४३ जागांसाठी ७.७९ कोटी मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत. त्यातील ३८ जागा अनुसूचित जातींसाठी आणि २ जागा अनुसूचित प्रजातींसाठी आरक्षित आहेत. जातीय राजकारणासोबतच सुशांत, हसरथ, कोरोना असे ताजे मुद्दे महाराष्ट्र-बिहारच्या राजकारणात पुढील काही दिवस चांगलाच कहर करणार आहेत.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा