Advertisement

शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देण्यासाठी सरकार सकारात्मक- चंद्रकांत पाटील


शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देण्यासाठी सरकार सकारात्मक- चंद्रकांत पाटील
SHARES

वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. येत्या 8 दिवसात शासकीय वसाहतीत भेट देऊ, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले.

वांद्रे शासकीय वसाहतीतील जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणीसंदर्भात शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी लक्षवेधी सूचना मांडली. वसाहतीतील 370 इमारतींपैकी फक्त 25 इमारतींचे काम धीम्या गतीने सुरू आहे, याकडे अनिल परब यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.  शासकीय वसाहतीमधल्या इमारतींचे अर्धवट बांधकाम, दुरुस्तीकडे संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचे होत असलेले जाणीवपूर्वक  दुर्लक्ष आदी बाबींमुळे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. इथल्या इमारतींची दयनीय अवस्था पाहता इमारतींची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर, काँग्रेसचे भाई जगताप यांनी भाग घेतला.

सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची घरे द्या
पोलिसांना जशी हक्काची घरे देण्यासाठी पुढाकार घेतला गेला त्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना देखील हक्काची घरे द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार भाई जगतापयांनी केली.

हक्काची घरे देण्याबाबत सरकार सकारात्मक
सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराबाबत सरकार गंभीर आहे. दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येईल. तसेच त्यांना हक्काची घरे देण्यासाठी सकारात्मक विचार करू असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या लेखी उत्तरात दिले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा