Advertisement

मुंबईत काँग्रेसचा बंद मनसेकडून हायजॅक?

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचाच जास्त प्रभाव या बंद दरम्यान पाहायला मिळाला. काँग्रेसला म्हणावी, तशी आक्रमकता दाखवता न आल्याचा फायदा घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने आंदोलन करून सार्वजनिक व्यवस्था बंद पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

मुंबईत काँग्रेसचा बंद मनसेकडून हायजॅक?
SHARES

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या 'भारत बंद'ला मुंबईतही संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेसने दिलेल्या बंदच्या हाकेला विरोधी पक्षांची साथ मिळाली असली, तरी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचाच जास्त प्रभाव या बंद दरम्यान पाहायला मिळाला. काँग्रेसला म्हणावी, तशी आक्रमकता दाखवता न आल्याचा फायदा घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने आंदोलन करून सार्वजनिक व्यवस्था बंद पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.


अंधेरीत काँग्रेस नेते ट्रॅकवर

मुंबईत सकाळच्या वेळेस काँग्रेस कार्यकर्त्यांनी गटागटाने दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. या बंदमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि माणिकराव ठाकरे रस्त्यावर उतरले. त्यांनी लोकलमध्ये प्रवास करून प्रवाशांना बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन केलं त्यानंतर अंधेरी स्थानकात ट्रॅकवर उतरून रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासाच्या आत रेल्वे पोलिसांनी त्यांना ट्रॅकवरून हटवत, रेल्वे सेवा सुरूळीत केली.


'इथं' दिसला मनसेचा प्रभाव

मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बंदचा नूर पालटला. गोरेगावच्या दिंडोशी भागात मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडलं. एवढंच नाही, तर दिंडोशीमधील भाजपा कार्यालवर हल्ला चढवत कार्यालयाची तोडफोड केली. अंधेरीतील डी. एन. नगर मेट्रो स्थानकात उतरून मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो रोखली. गोरेगावात बेस्टच्या बसची हवा काढून वाहतूक रोखण्याचा प्रयत्नही मनसे कार्यकर्त्यांनी केला.




मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

दादर मध्यवर्ती परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. घोळक्याने फिरत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यावर काही काळ तिथलं वातावरण तापलं होतं. प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात पोस्ट तिकिटाचं प्रकाशन करून परतत असताना मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवले. याठिकाणी बऱ्याच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.

अशा विविध पद्धतीने आंदोलन केल्याने काँग्रेसऐवजी शहरात मनसेचीच अधिक चर्चा झाली. मनसेच्या आंदोलनाचा इतिहास पाहता, मनसेने काँग्रेसच्या 'भारत बंद'ला पाठिंबा दिला तेव्हाच मुंबईत मनसेचा प्रभाव दिसणार असं म्हटलं जातं होतं. त्यानुसार आक्रमक आंदोलन करून मनसेने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवल्याचं चित्र दिवसभर दिसलं.



हेही वाचा-

देशात कुठेही हिंसाचार नाही, बंद १०० टक्के यशस्वी- अशोक चव्हाण

इंधनदरवाढीच्या भडक्यावर भाजपाचे हात वर, सर्वसामान्यांना दिलासा नाही?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा