Advertisement

मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही - राज


मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही - राज
SHARES

मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. मुंबईकरांचा रेल्वेप्रवास सुरक्षित आणि सुखकर होत नाही, तोपर्यंत बुलेट ट्रेनची एक वीटही रचू देणार नाही, असा इशार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मुंबईतील 'कृष्णकुंज' या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली.


बुलेट ट्रेनच्या हट्टापायी प्रभूंना हटवले...

'इथे लोकांचे चालणे कठीण झाले आहे. मग बुलेट ट्रेन हवी तरी कशाला? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल, तर त्यांनी गुजरातमध्ये करावी आणि जर जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही जबरदस्ती होईल' असा इशाराच राज ठाकरेंनी मोदींना दिला. तसेच मोदींनी बुलेट ट्रेनच्या हट्टापायी प्रभूंना हटवले आणि या पियूष गोयल याला खुर्चीवर बसवले. या पियूषपेक्षा आमचं आस्वादमधलं 'पियूष' तरी बरं असा खोचक टोला देखील राज ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हमध्ये रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना लगावला.


एल्फिन्स्टन दुर्घटनेबद्दल काय म्हणाले राज?

एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन दुर्घटना, ती अतिशय दुर्दैवी होती. पण व्यवस्था, यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून काल घटनास्थळी गेलो नाही. चिंतेचा आव आणून त्या गोष्टी पाहण्यात अर्थ नसतो. संजय गवते 10 ते 15 वर्ष एल्फिन्स्टन पुलासाठी भांडत आहेत. तर बाळा नांदगावकरांनीही अनेक वर्ष याचा पाठपुरावा केला आहे. परंतु एवढ्या वर्षांत काहीही झालेले नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. बाळा नांदगावकर यांच्या पत्राला उत्तर देताना रेल्वे प्रशासन म्हणाले, या पुलाचे काम करण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. सगळे आपली जबाबदारी झटकत आहेत. काम करायला कोणी तयार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.


5 तारीखला रेल्वेच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा

येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशनच्या अवस्थेबद्दल माहिती घेणार आणि 5 ऑक्टोबरला रेल्वेच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढणार, असा इशाराच राज ठाकरे यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी मुंबईकरांना देखील या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


घालायला चड्डी नाही आणि चाललेत सुटाचं कापड घ्यायला!

स्टेशनवर व्यवस्थित चालता यावे यासाठी, स्टेशनवरील गर्दी कशी कमी करता येईल यासाठी काम न करता बुलेट ट्रेन आणली जात आहे. काँग्रेस गेले आणि भाजपा आले, फरक काय पडला? फक्त नोटेचा रंग बदलला. लोंढे थांबत नाहीत तोवर काही होणार नाही. आधीच मेट्रोने मुंबईची वाट लावली, असे सांगत 'घालायला चड्डी नाही आणि चाललेत सुटाचं कापड घ्यायला' असा खोचक टोला राज ठाकरे यांनी यावेळी लागवला.


राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद पहाण्यासाठी खाली क्लिक करा:




हे वाचा -

राज ठाकरेंची फेसबुकवर पहिली राजकीय भूमिका - बाबासाहेबांचे स्मारक नको, ग्रंथालय असावे!
'वाढते लोंढे थांबत नाहीत, तोपर्यंत मुंबईचा विकास नाही' - राज ठाकरे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा