Advertisement

काहीही झालं तरी वाढीव वीजबिल भरू नका- राज ठाकरे

काही झालं तरी वाढीव वीज देयकं भरू नका. असहकार पुकारल्याशिवाय सरकारला जनतेतील असंतोष जाणवणार नाही, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

काहीही झालं तरी वाढीव वीजबिल भरू नका- राज ठाकरे
SHARES

वाढीव वीज बिलाविरोधात शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (mns) महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मनसेकडून वाढीव वीज बिल माफ करण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आलं आहे, असं असतानाच काही झालं तरी वाढीव वीज देयकं भरू नका. असहकार पुकारल्याशिवाय सरकारला जनतेतील असंतोष जाणवणार नाही, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

राज ठाकरे (raj thackeray) यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करताना सांगितलं, कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सैनिकांना रस्त्यावर उतरून, मोर्चा काढून संघर्ष करायला लागावा हे दुर्दैवी आहे. पण सरकारला आर्जवांची भाषा समजत नाही. त्यामुळे मोर्चाच्या भाषेत समजवण्याची वेळ आली आहे.

एप्रिल महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचं अपरिमित आर्थिक नुकसान झालं. व्यवसायांना घरघर लागली. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती तर दुसरीकडे ठप्प झालेलं अर्थकारण या दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असतानाच महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शाॅक दिला आणि जनतेचे डोळे पांढरे झाले. एरवी वर्षभराचं वीज देयक जितकं येतं, तितक्या वीजेची आकारणी केवळ तीन महिन्यांच्या वापराबाबत सरकारने जनतेला पाठवली. एप्रिल-मे-जून महिन्यांत अनेक खासगी कार्यालयांची आस्थापने बंद होती. तरीही त्यांना भरभक्कम वीज देयके पाठवली. पूर्वी परकीय राजवटीत जिझिया कर लावला जायचा, या सरकारने वीज देयकांच्या माध्यमातून जिझिया कर लावला आणि जनतेची लूट सुरू केली.  

हेही वाचा- ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

या विषयावर मनसेच्या नेत्यांनी ऊर्जामंत्र्यांची (nitin raut) भेट घेतली. त्यांच्याकडे जनतेचं गाऱ्हाणं मांडलं. जनतेला या कठीण परिस्थितीत लुटू नका असा आर्जव केला. या विषयावर काहीतरी सकारात्मक पाऊल सरकार उचलेल, असं नेहमीचं थातूरमातुर उत्तर त्यांनी दिलं. या पलिकडे काहीच घडलं नाही. पुढं आम्ही हा विषय राज्यपालांपर्यंत नेला. त्यांना या विषयातील गांभीर्य जाणवत होतं. त्यांनी देखील सरकार या विषयात काहीच करत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं. त्यात १०० युनिटपर्यंत वीज देयकांमध्ये सवलत देऊ अशी भाषा करणारे ऊर्जामंत्री घुमजाव करून वीज देयक भरलंच पाहिजे आणि कोणतीही सवलत मिळणार नाही, अशी भाषा बोलू लागले आणि आमचा संयम संपला. काेरोनाचा काळ कठीण आहे हे लक्षात घेऊन आम्ही सरकारच्या बाजूने ठामपणे उभं राहिलो. पण हे सरकार जनतेलाच वाढीव वीज आकारणीचा शाॅक देणार असेल, तर आम्हालाही जनतेच्या वतीने सरकारला शाॅक द्यावा लागेल. असली मनमानी आम्ही खपवून घेणार नाही.

त्यामुळे काही झालं तरी वीज देयकं भरू नका. असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारला जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकार तुमच्या विजेची जोडणी तोडू शकत नाही. जर त्यांनी असा प्रयत्न केला, तर त्यांचा संघर्ष महाराष्ट्र सैनिकांशी आहे, हे लक्षात ठेवा. सरकारने जनतेला गृहीत धरू नये. आम्हाला संघर्ष नवीन नसला, तरी ही वेळ संघर्षाची नाही याचं भान सरकारने बाळगावं. समंजस भूमिका घेत वीज देयकांत सवलत देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. 

(mns chief raj thackeray warns maharashtra government to reduce extra electricity bill during lockdown)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा