Advertisement

Unlock 5: कर्मचाऱ्यांनी उडत कामाला जायचं का? वाहतूक व्यवस्थेवर मनसेचा सवाल

रेस्टाॅरंट क्षेत्रात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं? असा प्रश्न मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

Unlock 5: कर्मचाऱ्यांनी उडत कामाला जायचं का? वाहतूक व्यवस्थेवर मनसेचा सवाल
SHARES

‘मिशन बिगीन अगेन’ म्हणत महाराष्ट्र सरकार हळुहळू सर्व उद्योगधंदे सुरू करत आहे. अनलाॅक ५ (Unlock 5) अंतर्गत आणखी काही सेवा क्षेत्रांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल. परंतु तसं करत असताना सार्वजनिक वाहतूक सेवेचं काय? या कर्मचाऱ्यांनी काय उडत कामाला जायचं का? असा महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारला विचारला आहे. (mns raises questions on public transport system and mumbai local train during unlock procedure in maharashtra)

राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू होऊन आता ३ महिने होत आले आहेत. अटी-शर्थींच्या आधारे राज्यातील बऱ्यापैकी उद्योगधंदे, कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे कर्मचारी, नोकरदार, व्यावसायिकांची ये-जा देखील पूर्वीपेक्षा वाढलेली आहे. त्यातुलनेत सार्वजनिक वाहतुकीची साधनं मात्र अपुरी पडत आहेत. मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकल ट्रेन सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहे. त्यात काही महत्त्वाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु सर्वसामान्यांना मात्र अद्याप लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी नाही.

हेही वाचा - गुड न्यूज! रेस्टाॅरंट लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

परिणामी आपला उद्योगधंदा, कार्यालय इ. ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवाशांना एसटी, बेस्ट बस, खासगी वाहन, रिक्षा-टॅक्सीवर अवलंबून राहावं लागत आहे. खासगी वाहन किंवा रिक्षा-टॅक्सीची सेवा रोज रोज न परवडणाऱ्या सर्वसामान्यांना तर केवळ बेस्ट आणि एसटी बसचाच आधार आहे. परंतु या बस सेवा देखील मर्यादीत प्रमाणात धावत असल्याने आणि प्रवाशांची संख्या मोठी असल्याने बसमध्ये चढण्यासाठीही रांगेत कित्येक तास तिष्ठत उभं राहावं लागत आहे. पुन्हा या बसमधील प्रचंड गर्दीमुळे कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा धोकाही आहेच. रस्त्यावरील वाहतूककोंडी, प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ यामुळे नोकरदार, व्यावसायिकांच्या प्रवासाचा वेळापत्रक कोलमडून पडलं आहे. प्रवासात दररोज हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत. 

परिणामी लोकल ट्रेनची सेवा सुरू करण्याची मागणी अधूनमधून डोकं वर काढत आहे. याच मागणीसाठी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेस्टाॅरंट्सना अटी-शर्थींच्या आधारे लवकरच सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे संकेत दिल्याने पुन्हा या कर्मचाऱ्यांची देखील इतर प्रवाशांमध्ये भर पडणार आहे.

त्याच अनुषंगाने रेस्टाॅरंट क्षेत्रात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं? असा प्रश्न मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा