Advertisement

घुसखोरांविरूद्ध मोर्चा: मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीसा

मुंबई पोलिसांकडून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

घुसखोरांविरूद्ध मोर्चा: मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीसा
SHARES

येत्या रविवारी ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी सुरू असतानाच मुंबई पोलिसांकडून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

या मोर्चाचं थेट प्रक्षेपण आपल्याला मुंबई लाइव्हच्या फेसबुक पेजवर बघता येईल.  

हेही वाचा- मुंबई कशी पोखरली जातेय, ते बघा, मनसेचा नवा व्हिडिओ व्हायरल

देशात राहणाऱ्या घुसखोरांविरूद्ध मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. परंतु…

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर हे माझे बांधव नाहीत. ते भारतीय नाहीत. त्यांना या देशातून हाकललंच पाहिजे. कारण भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही. त्यामुळे रविवार ९ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२ वाजता गिरगाव चौपाटी हिंदू जिमखाना ते आझाद मैदान दरम्यान निघणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हा! असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.  

या मोर्चासाठी आधी भायखळा ते आझाद मैदान असा मार्ग मनसेने सुचवला होता. परंतु या मार्गावर मुस्लिमबहुल वस्ती असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने मुंबई पोलिसांनी या मार्गाला परवानगी नाकारली होती. त्याशिवाय राज ठाकरे यांनी मशिदीवरील भाेंगे, सीएए-एनआरसीला विरोध करणाऱ्या मुस्लिमांच्या कृतीवर आक्षेप घेतल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही मुंबई पोलिसांपुढे होता. त्यानंतर मनसेने पर्यायी मार्गाने मोर्चा काढण्याचं ठरवलं. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नुकताच या मार्गाची पाहणी देखील केली.

हेही वाचा- घुसखोरांना हाकलायचंय? आधी वांद्र्यापासून सुरूवात करा, मनसेचं मातोश्रीबाहेर पोस्टर

मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जागोजागी घुसखोरांविरोधात पोस्टर लावले असून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून मनसेकडून वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू असताना मुंबई पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची दक्षता घेत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कलम १४३, १४४ आणि १४९ नुसार नोटीसा पाठवल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा