Advertisement

मुंबई पोलिसांची नाहक बदनामी, गृहमंत्र्यांचा याचिकेला पाठिंबा

सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांना ज्या पद्धतीनं विनाकारण लक्ष्य केलं जात आहे, ते चुकीचं आहे, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

मुंबई पोलिसांची नाहक बदनामी, गृहमंत्र्यांचा याचिकेला पाठिंबा
SHARES

महाराष्ट्र व मुंबई पोलिसांची एक वेगळी प्रतिष्ठा आहे. मात्र सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांना ज्या पद्धतीनं विनाकारण लक्ष्य केलं जात आहे, ते चुकीचं आहे, असं म्हणत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेचं स्वागत केलं. (mumbai police targeted in sushant singh rajput suicide case says maharashtra home minister anil deshmukh)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला २ महिने उलटून गेले. तरीही अद्याप त्याच्या आत्महत्येचे गूढ गुलदस्त्यातच आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. परंतु या प्रकरणाच्या सुरूवातीपासूनच मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच काही माध्यमांनी मुंबई पोलिसांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केल्याने सर्वच स्तरावरून मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले.

हेही वाचा - ती व्यक्ती मुलींसाठी धोकादायक! काँग्रेसचा कंगनाला सल्ला

मुंबई पोलिसांविरोधात जाणीवपूर्वक खोट्या, चुकीच्या, निराधार बातम्या दाखवत मुंबई पोलिसांना बदनाम केलं जात असल्याचं म्हणत महाराष्ट्र पोलिस दलातील ८ निवृत्त आपीएस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत अशा चुकीच्या व निराधार बातम्या प्रसारीत करण्यास  प्रतिबंध करण्याची विनंती या अधिकाऱ्यांनी आपल्या याचिकेतून न्यायालयाला केली आहे.

याचिकाकर्त्यांमध्ये राज्याचे माजी पोलिस महासंचालक एम. एन. सिंग, पी. एस. पसरिचा, डी. के. शिवानंदन, संजीव दयाळ, सतीश माथुर व के. सुब्रमण्यम तसेच माजी मुंबई पोलिस आयुक्त डी. एन. जाधव व माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांचा समावेश आहे. 

त्यावर प्रश्न विचारला असताना एका वृत्तसंस्थेशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र व मुंबई पोलिसांची एक वेगळी प्रतिष्ठा आहे. येथील पोलिसांची स्कॉर्टलँड यार्डच्या पोलिसांशी तुलना केली जाते. मात्र, सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांना ज्या पद्धतीनं विनाकारण लक्ष्य केलं जात आहे, ते चुकीचं आहे. निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेचं मी स्वागत करतो.

दरम्यान अभिनेत्री कंगना राणवत हिने देखील मुंबई पोलिसांवर टीका करताना आपल्याला गुंड आणि मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, असं ट्विट केलं होत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा