Advertisement

दादरमध्ये मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात


दादरमध्ये मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई करून रेल्वे परिसर फेरीवाला मुक्त बनवण्यात येत आहे. रेल्वे परिसरातील या कारवाईमुळे नागरिकांना विनाअडथळा, तसेच गर्दीविना मोकळेपणाने चालता येत आहे. त्यामुळे भविष्यातही ही परिस्थिती कायम राहावी, म्हणून मनसेच्या वतीने काढलेल्या मूक मोर्चात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर हद्द निश्चित करून रेल्वे आणि महापालिका प्रशासन यांनी कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, रेल्वेचे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन कारवाई अधिक प्रभावीपणे करण्याची मागणी केली आहे.

महापलिका आणि रेल्वे प्रशासनाच्या फेरीवाल्यांवरील संयुक्त कारवाईमुळे मुंबईतील रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूचा परिसर मोकळा श्वास घेत आहे. पण हीच परिस्थिती कायम राहावी आणि फेरीवाल्यांवर पक्षाचा धाक कायम राहावा यासाठी मनसेने बुधवारी
सकाळी दादर रेल्वे स्टेशनबाहेर पक्षाच्या वतीने ध्वजसंचलन केले. यामध्ये पक्षाचे नेते, पदाधिकारी आदींनी तोंडाला पट्ट्या लावून मूक मोर्चाच्या माध्यमातून फेरीवाल्यांना सूचक इशाराही देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, हा मूक मोर्चा सुरू असताना जमावबंदीचे कारण देत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. शांततेत आंदोलन करत असताना पोलिसांनी केलेली ही कारवाई अयोग्य असल्याची भूमिका मनसेने व्यक्त केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेला मोर्चा काढण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे, असे सांगण्यात येत आहे.



हेही वाचा

हप्तेखोरी थांबवा, नाहीतर मनसेचा पुन्हा मोर्चा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा