मंत्रिपदासाठी राणेंना अजून करावी लागणार प्रतीक्षा


SHARE

महाराष्ट्र स्वभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना मंत्रिपदासाठी अजून काही महिने तरी वाट पहावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या भाजपा कोअर समितीच्या बैठकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राणेंच्या प्रवेशाला तीव्र विरोध केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राणेंचा प्रवेश हा हिवाळी अधिवेशनानंतर होईल असे एकंदरीत चित्र आहे.


बैठकीला कोण होते उपस्थित?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत शेतकरी कर्जमाफीतील गोंधळ, सोशल मीडियावर भाजपा सरकारविरोधात वाढत असलेला असंतोष, भाजपा मंत्र्यांची वादग्रस्त विधाने याबरोबरच राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळातील समावेशावरही चर्चा झाल्याचे भाजपा गोटातून सांगण्यात आले.


बैठकीचा अहवाल दिल्लीत पाठवला

या बैठकीचा अहवाल दिल्लीत पक्षाध्यक्षांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा राणेंच्या प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले. डिसेंबरमध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत असून अधिवेशनाच्या तोंडावर राज्य सरकारमध्ये अंतर्गत वाद उफाळून येऊ नयेत आणि शिवसेनेची उघड नाराजी अंगावर ओढवून घेण्यापेक्षा अधिवेशनापर्यंत राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश लांबवता आला, तर लांबवावा असे मत कोअर समितीत काहींनी व्यक्त केले.


'राणेंची दुय्यम दर्जाच्या खात्यावर बोळवण करा'

याचबरोबर राणेंना मंत्रिमंडळात घ्यायचेच असेल तर दुय्यम दर्जाच्या खात्यावर त्यांची बोळवण करावी असाही सूर आळवण्यात आला. शेतकरी कर्जमाफीमध्ये जिल्हा आणि तालुकापातळीवर सुरू असलेल्या गोंधळाचा फटका राज्य सरकारच्या प्रतिमेला बसत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.हेही वाचा - 

नारायण राणे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

नारायण राणे चुकूनही मंत्री बनणार नाहीत- दीपक केसरकर


संबंधित विषय