Advertisement

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही : शरद पवार

जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असं स्पष्ट केलं.

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही : शरद पवार
SHARES

विधानसभा निवडणुकीत '२२० के पार' चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय. सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असं स्पष्ट केलं.

"२२० चा आकडा गाठण्यास अपयशी"

महाराष्ट्र विधानसभेत २२० च्या पुढे जागा महायुती जिंकेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. प्रत्यक्षात तसं घडलं नाही. महायुतीमध्ये भाजपाला १०० ते १०५ जागांच्या आसपास आघाडी मिळाली आहे तर शिवसेनेला ६४ जागांवर आघाडी मिळाली आहे. बहुमताच्या आकड्याजवळ महायुती जात आहे. मात्र भाजपाच्या जागा कमी झाल्यानं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.

"जनतेनं दाखवून दिलं"

ईडीसारख्या संस्थांचा दुरुपयोग करून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. हे या निवडणुकीतून जनतेनं सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलं, असं पवार म्हणाले. ३७० कलमला पक्षाचा विरोधच नव्हता. पण त्यावरून विरोधकांना 'डुब मरो जाओ' अशी भाषा पंतप्रधानांनी करणं योग्य नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना शोभत नाही, असा टोला पवारांनी मोदींना लगावला.

"विरोधी पक्षात बसू”

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. पण जनतेचा निर्णय आम्ही स्वीकारतो. सत्ता जाते सत्ता येते मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. या निवडणुकीत किती टोकाची टीका करावी याची सीमा काहींनी ओलांडली होती, असं शरद पवार म्हणाले. पक्षांतर करणाऱ्यांना या निवडणुकी जनतेनं धडा शिकवला, असं पवारांनी स्पष्ट केलं.

"दिवाळीनंतर बैठक”

सध्या दिवाळीचं वातावरण आहे. यामुळे पक्षाची बैठक दिवाळीनंतर घ्यावी, अशी पक्ष नेत्यांची मागणी आहे. त्यावेळी निवडणुकीतील पराभवावर चिंतन करू. यानंतर मित्र पक्षांसोबतही बैठक घेऊन पुढील रणनिती ठरवणार आहोत, अशी माहिती शरद पवारांनी दिली.हेही वाचा

वरळीतून आदित्य ठाकरे ६७ हजार ६७२ मतांनी विजयी

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement