Advertisement

नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, शरद पवारांनी पार्थला फटकारलं

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नसल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारलं आहे.

नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, शरद पवारांनी पार्थला फटकारलं
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नसल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारलं आहे. शरद पवार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात बुधवार १२ आॅगस्ट २०२० रोजी नरिमन पाॅईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं. (ncp chief sharad pawar slams parth pawar over demanding cbi inquiry of sushant singh rajput suicide case)

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारं निवेदन गृहमंत्र्यांना दिलं. आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत. खासकरून यूपी, बिहारमधून अधिक फोन येत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी तरुणांची भावना असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं होतं.

हेही वाचा - सुशांतच्या आत्महत्येच्या चर्चा आश्चर्यजनक, शरद पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

त्यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही कुणाला सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

एका अभिनेत्याने आत्महत्या करणं नक्कीच दुर्दैवी आहे.एखाद्याने आत्महत्या केली तर त्यावर दु:ख होणं स्वाभाविक आहे. परंतु या प्रकरणाची ज्या पद्धतीने मीडियात चर्चा सुरू आहे, ते पाहून आश्चर्य वाटतं. या प्रकरणात कुणी कुणावर काय आरोप केले या खोलात मला जायचं नाही. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेत नाही, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - Aaditya Thackeray: तुम्हाला व तुमच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल- निलेश राणे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा