Advertisement

मुख्यमंत्र्यांनी घरीच केली विठ्ठलाची पूजा


मुख्यमंत्र्यांनी घरीच केली विठ्ठलाची पूजा
SHARES

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पहाटे मुंबईतील वर्षा बंगल्यावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजाला सुखात ठेव, असं साकडं विठ्ठलाला घातलं.




विठ्ठलाला घातलं साकडं

यंदा प्रथमच मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' बंगल्यावर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची प्रतिमूर्ती ठवून महापूजा केली. मराठा समाजाच्या तीव्र आंदोलनामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेत सपत्नीक वर्षा या निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली. तसंच राज्यातील शेतकऱ्यांना सुखात ठेव, अशी प्रार्थना करत महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, असं साकडं विठ्ठलाला घातलं.


म्हणून पंढरपुरात गेले नाही

मी साडेबार कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून पंढरपुरातील महापुजेत सहभागी होतो. परंतु मी या पुजेत सहभागी होऊ नये म्हणून काही मराठा आंदोलक प्रयत्नशील आहेत. या विरोधामुळे पंढरपूरला येणाऱ्या १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. इथं हिंसाचाराचा कट होण्याची देखील शक्यता आहे. मला तर झेड प्लस सुरक्षा आहे, परंतु जर वारकऱ्याला जीवाला काही झालं, तर महाराष्ट्र ही घटना कधीही माफ करणार नाही, त्यामुळेच मी यावर्षी महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आपण मुंबईतील वर्षा बंगल्यावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा करणार असल्याचं फडणवीस यांनी रविवारी सांगितलं होतं.


वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात गर्दी

''तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल'', अशा गजरात सोमवारी सकाळपासूनच मुंबईतील प्रत्येक विठ्ठल मंदीरात भक्तांची गर्दी ओसंडून वहात होती. टाळ-मृदंगाच्या नादात लीन झालेले भाविक जागोजागी पाहायला मिळत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या वडाळ्यातील विठ्ठल रखूमाई मंदिरात वैष्णवांचा मेळा जमला होता.



आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नाम आळवत पायी चालत पंढरपूर गाठतात. परंतु मुंबई आणि परिसरातील ज्या भाविकांना पंढरपूरला जायला जमत नाही, ते आवर्जून वडाळ्यातील प्रतिपंढपूर मंदिरात येऊन विठ्ठल-रखूमाईचं दर्शन घेतात. यंदा आमदार प्रसाद लाड सपत्नीक विठ्ठल मंदिरातील महापूजेत सहभागी झाले होते. तर प्रवास करून येणाऱ्या भाविकांसाठी डब्बेवाल्यांच्या रोटी बँकेच्यावतीनं फराळ व पाण्याचं वाटप करण्यात आलं.


हेही वाचा -

मराठा मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांची 'पंढरपूर वारी' रद्द!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा