'गली गली में शोर है...!'

  Vidhan Bhavan
  'गली गली में शोर है...!'
  मुंबई  -  

  चोर है चोर है, प्रकाश मेहता चोर है...विधानपरिषदेत शुक्रवारी विरोधक कंठरवाने या घोषणा देत होते. त्यांची मागणी एकच होती. जोपर्यंत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही. दिवसभर विरोधक मागणीवर ठाम राहिले आणि सत्ताधारी आपल्या भूमिकेवर. पण या सगळ्यात सभागृहाचं कामकाज मात्र होऊ शकलं नाही.


  वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर गदारोळ

  कथित भ्रष्टाचाराच्या ऑडियो क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना गुरुवारी पदावरून हटवल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केली. मात्र मोपलवार आणि मेहतांना वेगळा न्याय का? असा प्रश्न करत विरोधकांनी प्रकाश मेहतांच्याही राजीनाम्याची मागणी केली.


  ..अडून बसले विरोधक

  शुक्रवारी सकाळपासूनच विरोधकांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या विरोधात मोर्चा बांधला. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मेहतांच्या राजीनाम्यासाठी विरोधक अडून बसले. विशेष बैठक असो अथवा नियमित बैठक..'मेहता जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही' असा पवित्रा घेत विरोधकांंनी हंगामा केला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही विरोधकांनी सभागृहाचे कामकाज होऊ दिले नाही.


  ...प्रकाश मेहता चोर है

  आपल्या मागणीला सत्ताधारी मानत नसल्याचं बघून विरोधत वेलमध्ये उतरले. 'चोर है चौर है, प्रकाश मेहता चोर है' अशा घोषणा द्यायला विरोधकांनी सुरुवात केली. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे दिवसभरात तब्बल 8 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं.

  मुंबईसह राज्यातील 27 महापालिकांसदर्भात नियम 260 अन्वये चर्चा करण्यासाठी सकाळी 10 वाजता विशेष बैठक सुरू झाली. मात्र तेव्हापासूनच विरोधकांनी प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याच्या मागणीचा धोशा सुरू केला.


  गेल्या तीन दिवसांपासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मात्र त्याबद्दल सभागृहात चकार शब्दही काढायला कुणी तयार नाही

  शरद रणपिसे, आमदार, काँग्रेस

  हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे जोपर्यंत प्रकाश मेहता राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही.

  हेमंत टकले, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

  ज्या विषयावर चर्चा होणार आहे, तो गृहनिर्माण मंत्र्यांच्याच खात्याशी संबंधित आहे. त्यांच्यावरच विकासकाला एक हजार कोटींचा फायदा मिळवून दिल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही आम्ही मेहतांच्या राजीनाम्यावर ठाम आहोत.

  धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद


  गोंधळातच विधेयके मंजूर

  दुपारी 1 वाजता सभागृह सुरू होताच गोंधळातच महाराष्ट्र मोटार वाहन सुधारणा विधेयक 2017, महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2017 ही दोन्ही विधेयके मंजूर करण्यात आली. प्रश्नोत्तरांचा तास घेण्यात आला मात्र तोही गोंधळातच गुंडाळण्यात आला.  हेही वाचा

  खडसे पुन्हा सत्ताधाऱ्यांवर बरसले!


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.