Advertisement

साम, दाम, दंड, भेदानंतर मुख्यमंत्र्यांचीही युतीला साद

सेनेला प्रत्येक प्रचारसभेत अंगावर घेताना दिसणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकालानंतर मात्र सेनेबाबत सौम्य झाले. सेनेविरोधात एकही अक्षर न बोलता सेनेमध्ये आणि आपल्यामध्ये काही वादच नव्हता, असं दाखवताना दिसले. तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा युतीसाठी प्रेमानं साद घालत युतीत अजूनही सर्व काही अलबेल असल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केला.

साम, दाम, दंड, भेदानंतर मुख्यमंत्र्यांचीही युतीला साद
SHARES

पालघर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपा-शिवसेनेतील संबंध आणखी ताणले जातील या प्रसारमाध्यमांच्या आणि राजकीय वर्तुळातील चर्चेला भाजपा-सेनेनं पुन्हा खोटं ठरवलं आहे. एकीकडे सेना सत्तेतून बाहेर पडणार ही चर्चा सेनेनं राजीनामे खिशातच ठेवत हवेत विरवली. तर दुसरीकडं भाजपावर आगपाखड करणाऱ्या सेनेला प्रत्येक प्रचारसभेत अंगावर घेताना दिसणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकालानंतर मात्र सेनेबाबत सौम्य झाले. सेनेविरोधात एकही अक्षर न बोलता सेनेमध्ये आणि आपल्यामध्ये काही वादच नव्हता, असं दाखवताना दिसले. तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा युतीसाठी प्रेमानं साद घालत युतीत अजूनही सर्व काही अलबेल असल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केला.

पालघर विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम पालघरच्या जनतेचे आभार मानत हा भाजपाचा मोठा विजय असल्याचं सांगितलं. तर सत्तेत असलेलेच दोन पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. पालघर पोटनिवडणुकीतील मतदान प्रक्रिया ज्या ईव्हीएम मशिन घोळावरून सर्वाधिक वादग्रस्त ठरली त्या घोळावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं नि ईव्हीएम घोळावरून भाजपाविरोधात होणारे सर्व आरोप फेटाळून लावले.

ईव्हीएममधील घोळ गंभीर बाब असून त्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करणं गरजेचं असल्याच मतही त्यांनी व्यक्त केलं. ईव्हीएमबाबत भाजपाला का जबाबदार धरता? असा सवाल करत विरोधकांकडून होणारे सर्व आरोप खोटे असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.


वनगा परिवारासाठी दार खुलं

आमच्याच आमदार पुत्राला पळवून नेत उमेदवारी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. पण त्याचवेळी वानगा कुटुंबाबद्दल भाजपाला अजूनही आस्था, आपुलकी असल्याचं सांगत आज आणि यापुढं कधीही वानगा कुटुंबासाठी भाजपाची दारं खुली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.


कडवटपणा संपला

'तुझं माझं ब्रेक अप' असं म्हणत सेना सातत्यानं यापुढं कधीही युती होणार नसल्याचं स्पष्ट करत आहे. पण दुसरीकडं केंद्रातील अमित शहासारख्या मोठ्या नेत्यांसह मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडूनच युतीसाठी शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न काही सोडताना दिसत नाही. राजकीय गरज म्हणून भाजपाकडं सेनेला गोंजारण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपा युतीसाठी जोर लावताना, सेनेकडून नकार असतानाही सेनेला गोंजारताना दिसत आहे. त्यातूनच पालघर निकालानंतरही मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिले आहेत. सेना आणि भाजपामधील कडवटपणा निकालानंतर आपल्याकडून तरी संपल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी युतीचा चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे.


शिवसेना बळी पडणार का?

ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील ही चर्चा निकालानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी खोटी ठरवली. त्यामुळं सत्तेत राहणं ही सेनेसाठीही गरजेचं आहे का? हाच सवाल यातून निर्माण झाला आहे. पण त्याचवेळी पोटनिवडणुकीतून स्वतच्या बळावर लढणाऱ्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं आहे, पालघरच्या जनतेनं सेनेला स्वीकारलं आहे. त्यातून सेनेला स्वत:ची ताकद नक्कीच समजली असेल. त्यामुळं सेना भाजपाच्या या गोंजारण्याला बळी पडते की स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहते हे आता येणारा काळच सांगेल.



हेही वाचा-

घटस्फोटाचा स्फोट नाहीच!

'हा' निवडणूक आयोगाचा विजय- राऊत



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा