तर, एका मिनिटांत भ्रष्ट मंत्री घरी जातील !


तर, एका मिनिटांत भ्रष्ट मंत्री घरी जातील !
SHARES

सरकार प्रामाणिक असेल तर गृहनिर्माण आणि उद्योग विभागातील गैरव्यवहारांची न्यायालयीन चौकशी करावी. मंत्री एका मिनिटांत घरी जातील, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकारला दिले आहे.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर तोफ डागली. ते म्हणाले की, आम्ही सर्व पुराव्यानिशी मंत्र्यांचे भ्रष्टाचार सभागृहात मांडले. या आधीही डझनभर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रदर्शन आम्ही भरवले होते. मात्र आमचा आवाज दडपण्यात आला.

मुख्यमंत्र्यांना राज्यात भ्रष्टाचार होत असल्याचेच मान्य नाही. पारदर्शक सरकारचा हा भ्रष्टाचार अपारदर्शक किंवा अदृश्य नाही. पण सरकार भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करत आहे. ‘झिरो टॉलरन्स टुवर्ड्स करप्शन’ असे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या पक्षाचे सरकार प्रत्यक्षात ‘झिरो अॅक्शन टुवर्ड्स करप्शन’ या भूमिकेतून काम करत आहे. पारदर्शकतेच्या चिखलात कमळ पार रुतून गेलेय, या शब्दांत विखे-पाटील यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.


ज्येष्ठ नेत्याचाही आवाज दडपला

सभागृहात विरोधी पक्षांचाच नव्हे, तर सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचाही आवाज दडपला जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. वारंवार मागणी करूनही माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उद्योग विभागाकडून माहिती मिळत नाही, याचाही दाखला विखे-पाटील यांनी दिला. भ्रष्टाचाराची प्रकरणे लावून धरण्यात प्रसारमाध्यमांनी सजग भूमिका वठवल्याचे सांगून विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचे आभारही मानले.


राज्यपालांची चपराक

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी निकाल जाहीर करण्यात प्रचंड गोंधळ घातला. दिलेल्या मुदतीतही ते निकाल घोषित करू शकले नाही. शिपायांकडून पेपर तपासले गेले. उत्तर काय लिहिले, ते न पाहता केवळ उत्तराची लांबी-रूंदी पाहून गुण दिले.

सरकारचे मंत्र्यांवर अन् मंत्र्यांचे आपल्या विभागांवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळेच मुंबईच्या कुलगुरूंना पदावरून दूर करण्याची शिफारस संबंधित मंत्री वेळीच करू शकले नाहीत. अखेर राज्यपालांनी स्वतः निर्णय घेऊन कुलगुरूंना पदावरून दूर केले. ही राज्य सरकारच्या कारभारावर चपराक असल्याचे विखे-पाटील म्हणाले.


पीक विमा योजनेवर ताशेरे

पीक विम्यातील त्रुटींवरही त्यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पीक विमा योजनेचे लाभार्थी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न झाले होते. पण या सरकारच्या काळात गेल्या वर्षी 1 कोटी विमाधारक शेतकऱ्यांची संख्या आता 40 लाखांवर आली आहे.

यापूर्वी ‘अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी’ या भारत सरकारच्या कंपनीकडे पीक विम्याचे काम होते. पण या सरकारने ते काम खासगी कंपनीला देऊन टाकले. 2016-17 मध्ये पीक विम्याचा हप्ता म्हणून 3947.80 कोटी भरले गेले. मात्र,त्या बदल्यात शेतकऱ्यांचे केवळ 1729.56 कोटी रूपयांचे दावे मंजूर झाले. एका वर्षात विमा कंपनीने 2200 कोटी रूपयांचा नफा कमावला. सरकारने अधिकाऱ्यांचे सल्ले ऐकून चांगल्या योजनांची वाट लावली आहे.


कर्जमाफी योजनेचा पंचनामा

कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील भोंगळ कारभाराचाही त्यांना पंचनामा केला. या योजनेसोबत सरकारने खरीपाच्या पेरणीसाठी 10 हजार रूपये अग्रीम उचल देण्याची घोषणा केली होती. परंतु, या योजनेचा बोजवारा उडाल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत राज्यभरात केवळ 20 हजार 978 शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रूपये मिळाले, अशी माहिती देऊन विखे-पाटील यांनी सरकारचे अपयश अधोरेखीत केले.

'हा तर काळू बाळूचा तमाशा म्हणत' विखे-पाटलांनी सभागृहात सादर केली कविता -

एकदा काळू म्हणाला बाळूला
चल एक खेळ खेळू...
जनता आहे साधी भोळी
चल सत्तेचा झिम्मा घालू...

‘सर्वांसाठी घरे’चा पत्ता नाही अजून
गृहनिर्माणच्या ‘प्रकाशा’ने महाराष्ट्र गेलाय उजळून...
ते म्हणतात मुख्यमंत्र्यांना केले होते ‘अवगत’
दिल्लीश्वरांच्या दबावाखाली मुख्यमंत्री गारगप..

‘एमआयडीसी’चे भूखंड गिळून
हे बिल्डरांचे मांडलिक...
धनुष्यबाण खाली ठेवून
हाती धरले ‘स्वस्तिक’...

शेलारांच्या खांद्यावर ठेवून बंदूक
निशाणा साधतात पालिकेचे ‘पहारेकरी’...
तर कधी सेनाध्यक्षांच्या भेटीला
दिल्लीचे सेनापती मातोश्रीच्या दरबारी...

विद्यार्थ्यांना ओलीस ठेवून
कुलगुरू राहिले निर्धोक...
‘तारीख पे तारीख’ देत
शिक्षणाचा केलाय ‘विनोद’...

सत्तेच्या सारीपाटात अनेकांचे होते ‘पानिपत’
नाथाभाऊंना मांडावी लागते अध्यक्षांकडे कैफियत...
धनुष्याच्या भात्याला कमळाचे अस्तर
सोनूच्या घरात म्हणे डेंग्यूचे मच्छर...

गळ्यात बांधून विकासाचं तुणतुणं
राज्याचा केलाय बिनढोलकीचा फड...
शेतकरी-जनसामान्यांच्या माथी फसवणूक
यांना बिल्डरांची मात्र येतेय कढ...

कमळ रूतलंय पारदर्शक चिखलात
महाराष्ट्राची झालीय दशा...
सरकार कसले हे राव
हा तर ‘काळू-बाळूचा तमाशा’...डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय