Advertisement

सल्ला लाखमोलाचा!

'हा' सल्ला मनसेचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांना टोचला असेल-नसेल, तरी केवळ राज ठाकरेच नाही, तर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यासाठी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हा सल्ला मोलाचा असाच आहे.

सल्ला लाखमोलाचा!
SHARES

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना नुकताच एक मोलाचा सल्ला दिला आहे. हा सल्ला मनसेचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांना टोचला असेल-नसेल, तरी केवळ राज ठाकरेच नाही, तर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यासाठी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हा सल्ला मोलाचा असाच आहे. 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झालेली असताना ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याससाठी सर्व तयारीनिशी सज्ज व्हा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील सर्वच ग्रामपंचायतीत आपले उमदेवार उभे करावेत आणि त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणवेत, असे निर्देश राज ठाकरे यांनी तमाम मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज ठाकरे यांच्या या तयारीबद्दल प्रसार माध्यमांनी चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना विचारणा केली होती. त्यावर राज ठाकरे यांना पक्ष वाढवायचा असेल, पक्ष संघटन मजबूत करायची असेल तर त्यांनी राज्यभर फिरायला हवं. आपण राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो, लोकांशी संवाद साधला तरच आपली ताकद किती आहे याचा अंदाज आपल्याला येतो. प्रत्येक निवडणूक लढल्याने आपल्याला नेमका किती जनाधार आहे, जनतेचा किती प्रतिसाद आहे, याचा अंदाज देखील येतो, असा सल्ला दिला होता.

सोबतच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करणार का? असा प्रश्न देखील पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला होता, त्यावर एकवेळ महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचा किती प्रभाव असेल, याचा अंदाज घेता येऊ शकतो. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा (mns) किती प्रभाव असेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप मनसेशी युती करणार नाही, हे स्पष्ट आहे, असं मत देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. 

चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी असे प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे भाजप-मनसे युतीची (bjp-mns) राजकीय वर्तुळात होत असलेली चर्चा होय. त्यातही मनसेने भगवा खांद्यावर घेतल्यापासून तर या चर्चांना जास्तच पेव फुटलेला आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला लांब करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. तेव्हापासून भाजप-शिवसेनेतून विस्तवही जात नाहीय, अशी परिस्थिती आहे.

नुकतीच झालेली विधान परिषदेची शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन लढवली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी (maha vikas aghadi) भाजपच्या उमेदवारांचा अक्षरश: धुव्वा उडवला. या विजयाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. येऊ घातलेल्या सर्व निवडणुका मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असोत (महापालिका, नगरपालिका) किंवा पोटनिवडणुका असोत एकत्र मिळून लढवण्यावरच या तिन्ही पक्षचा कल वाढलेला आहे. नुकतीच जाहीर झालेली ग्रामपंचायत निवडणूक देखील एकत्र लढवण्यावर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते चर्चा करत आहेत. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. तिघं मिळून आपण भाजपच्या विजयी रथाची घोडदौड रोखू शकतो, याची जाणीव महाविकास आघाडीला झाली आहे.

हेही वाचा- पक्ष वाढवायचा असेल तर.., चंद्रकांत पाटलांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

तर दुसरीकडे भाजप देखील ग्रामपंचायत निवडणुकीसोबत येऊ घातलेल्या मुंबई महापालिका, नाशिक महापालिका अशा निवडणुकांसाठी सज्ज होत आहे. भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेशी युती करायला काहीच हरकत नाही, त्यातून दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. भाजपचं सांगायचं झाल्यास काँग्रेस नंतर भाजपच असा पक्ष आहे की त्याचं पक्ष संघटन मागील काही वर्षांमध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. मागील काही वर्षांपासून कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते घेत असलेली मेहनत आणि हाती आलेली सत्ता याचा हा सगळा परिपाक आहे.

 मनसेसोबत किमान ग्रामपंचायत निवडणुकीत युती केली न केल्याने भाजपला फारसा फरक पडणार नाहीय. त्यामुळे भाजपची या युतीबद्दल भूमिका देखील स्पष्ट आहे. त्या तुलनेत काँग्रेसची (congress) पुरती बिकट अवस्था झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (shiv sena) या दोन्ही पक्षांचं आपापल्या भागांत वर्चस्व असलं, तरी राज्यभरात त्यांचंही संघटन मजबूत होण्यास बराच वाव आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास त्याचा काटाकाटीचं राजकारण सोडल्यास फायदाच होऊ शकतो.

मनसे बाबत काय सांगायचं? कुठल्या पक्षासोबत युती करायची अथवा न करायची हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण गाव खेड्यातली बातच सोडा, शहरात देखील पक्षाला मरगळ आलेली आहे. प्रत्येक पाॅकेटमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच कार्यकर्ते किंवा पदाधिकारी उरलेत. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांची संख्या प्रचंड आहे. निवडणूक कुठलीही असो, राज्यभर चांगली कामगिरी करायची, आपले उमेदवार निवडून आणायचे ही सोपी गोष्ट नाही. तेव्हा मनसेला खरोखरच जर आपला पक्ष वाढवायचा असेल, पक्ष संघटन तळागाळात रूजवायचं असेल. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच नव्हे, तर सोबतच्या इतर नेत्यांनी देखील महाराष्ट्रभर (maharashtra) दौरे करायला पाहिजेत.

गाव खेड्यापर्यंत पोहोचून तिथले प्रश्न समजून घ्यायला हवेत. स्थानिक प्रश्नांवर भूमिका घ्यायला हवी. जबाबदाऱ्या वाटून, माणसांची निवड करून कार्यकर्त्यांचं, पदाधिकारी, नेत्यांचं जाळं विणायला हवं. त्यातून निवडणूक लढवण्याचा आत्मविश्वास मिळू शकेल. प्रत्येक निवडणूक लढवल्यास पक्षाची बलस्थाने आणि कच्चे दुवे देखील लक्षात येऊ शकते. अर्थातच ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते, यात दुमत नाही. राज ठाकरे, पक्षाचे इतर नेते आपापल्या परीने तसे प्रयत्न देखील करत आहेत. परंतु त्याचा जोर वाढवण्याची गरज आहे. तसं झाल्यास भलेही आज यश मिळो न मिळो, परंतु भविष्यात एक ना एक दिवस मनसेला नक्कीच यश येऊ शकतं.

महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.

raj thackeray lead maharashtra navnirman sena to contest gram panchayat election 2021

हेही वाचा- ठाकरे सरकारची नवी परीक्षा, राज्यात १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा