CAB: शिवसेनेची गैरहजेरी भाजपच्या पथ्यावर?

या विधेयकावरील मतदानाच्या वेळेस ​शिवसेनेचे​​​ तीन्ही खासदार गैरहजर राहिले. याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच मिळाला. हे विधेयक १२५ विरूद्ध १०५ मतांनी राज्यसभेत मंजूर झालं.

SHARE

वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती विधेयक (CAB) लोकसभेपाठोपाठ बुधवारी राज्यसभेतही मंजूर झालं. या विधेयकाला शिवसेनेने भलेही आक्षेप घेतला असला तरी या विधेयकावरील मतदानाच्या वेळेस शिवसेनेचे तीन्ही खासदार गैरहजर राहिले. याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच मिळाला. हे विधेयक १२५ विरूद्ध १०५ मतांनी राज्यसभेत मंजूर झालं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सकाळी राज्यसभेत सादर केलं. दिवसभर या विधेयकावर वादळी चर्चा झाली. विरोधकांकडून या विधेयकावर जोरदार प्रहार करण्यात आले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या चर्चेत सहभागी होत आक्षेप नोंदवला. 

हेही वाचा- शिवसेनेने राज्यसभेत भूमिका कशी बदलली? अमित शहांचा टोला

ज्या लोकांचा या विधेयकाला विरोध आहे, ते देशद्रोही आणि ज्यांचा पाठिंबा आहे, ते देशभक्त असल्याची टीका केली जात आहे. पण शिवसेनेला कुणीही देशभक्ती शिकवू नये. तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात. त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत. या विधेयकावर धर्माच्या नव्हे, तर मानवतेच्या आधारावर चर्चा झाली पाहिजे. निर्वासीत आणि घुसखोर यांच्यात फरक असून देशातील घुसखोरांना सरकार बाहेर काढणार का? अशा शब्दांत राऊत यांनी या विधेयकावर जोरदार टीका केली.

त्याला प्रतिउत्तर देताना अमित शहा यांनीही शिवसेनेवर शेलक्या शब्दांत टीका केली. लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेची भूमिका रातोरात कशी बदलली? महाराष्ट्रातील सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने ही भूमिका बदलली का? असा सवाल केला. 

हेही वाचा- ‘त्या’ शाळेचे आम्ही हेडमास्तर, संजय राऊतांनी सुनावलं

शिवसेनेने लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही या विधेयकाला पाठिंबा दिला, तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत काँग्रेस पुनर्विचार करेल, असा दबाव काँग्रेसने टाकल्याने शिवसेनेने आपली भूमिका बदलल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शिवसेना स्वतंत्र राजकीय पक्ष असून आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. 

परंतु या विधेयकाच्या विरोधात शिवसेनेने मतदान करावं, अशी काँग्रेसची इच्छा होती. परंतु विरोधात मतदान न करता शिवसेनेने मतदानाच्या वेळेस राज्यसभेत अनुपस्थित राहण्याचं ठरवलं. यामुळे हे विधेयक १२५ विरूद्ध १०५ मतांनी राज्यसभेत मंजूर झालं.   

संबंधित विषय
ताज्या बातम्या