Advertisement

१ लाख ७२ हजार बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी- नवाब मलिक

३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठावरून १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे .

१ लाख ७२ हजार बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी- नवाब मलिक
SHARES

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली होती परंतु मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्हया जिल्ह्यात आयोजित केलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामुळे आणि महास्वयंम वेबपोर्टलच्या साहाय्याने तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला. तर ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठावरून १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे . या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी कौशल्य विभाग प्रयत्न करीत आहे अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

हेही वाचाः- जलसावरील कंटेन्मेंट झोन पोस्टर हटवलं

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते. मागील ३ महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात २४ हजार ५२०, नाशिक विभागात ३० हजार १४५, पुणे विभागात ३७ हजार ५६२, औरंगाबाद विभागात ३५ हजार २४३, अमरावती विभागात १४ हजार २६० तर नागपूर विभागात ३० हजार ४३५ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यापैकी १७ हजार १३३ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले असून यात मुंबई विभागातील ३ हजार ७२०, नाशिक विभागातील ४८२, पुणे विभागातील १० हजार ३१७, औरंगाबाद विभागातील १ हजार ५६९, अमरावती विभागातील १ हजार ०२२ तर नागपूर विभागातील २३ उमेदवारांचा सहभाग आहे.

हेही वाचाः- ठाण्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 'इतके' रुग्ण आतापर्यंत बरे

याशिवाय महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून ५८२ उमेदवारांना रोजगार मिळवून दिला आहे. कौशल्य विकास विभागाने मागील तीन महिन्यात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. मागील ३ महिन्यात २४ ऑनलाईन रोजगार मेळावे संपन्न झाले असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच मेळावे होणार आहेत. झालेल्या मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये ४० हजार २२९ नोकरी इच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २ हजार १४० तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचाः- धक्कादायक ! दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने पत्नीला जाळले

यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा