Advertisement

आंबेडकर स्मारकाचा मुद्दा पेटणार! ६ डिसेंबरला आंबेडकर अनुयायी धडकणार इंदू मिलवर

डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याविरोधात ६ डिसेंबरला रिपब्लिकन सेनेकडून इंदू मिल इथं तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

आंबेडकर स्मारकाचा मुद्दा पेटणार! ६ डिसेंबरला आंबेडकर अनुयायी धडकणार इंदू मिलवर
SHARES

इंदू मिल इथं डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बांधण्याचं काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असून राज्य सरकारनं या स्मारकातील डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेना आक्रमक झाली आहे. डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याविरोधात ६ डिसेंबरला रिपब्लिकन सेनेकडून इंदू मिल इथं तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळावी यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनापेक्षा ६ डिसेंबरचं आंदोलन मोठं असेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.


पुतळ्याची उंची कमी केली

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) च्या माध्यमातून इंदू मिल इथं आंबेडकर स्मारक बांधण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत डाॅ. आंबेडकरांचा ३५० फुटाचा जगातील सर्वात मोठा असा पुतळा बांधण्यात येणार आहे. पण सरकारनं अचानक स्मारकाची उंची कमी करत इथं २६१ फुटाचा पुतळा बांधण्याचं ठरवल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.

पुतळ्यासाठी ९९ फुटाचा चौथरा तर २६१ फुटाचा पुतळा असं बांधकाम केलं जाणार आहे. मुळात चौथरा वगळून पुतळ्याची उंची ३५० फुटाची असताना आता पुतळा केवळ २६१ फुटांचा करण्यात आल्यानं आंबेडकरी जनतेत नाराजी असल्याचं रिपब्लिकन सेनेचं म्हणणं आहे.


सरकार उदासीन

पुतळ्याची उंची कमी करत सरकारनं-एमएमआरडीएनं आंबेडकरी जनतेची घोर फसवणूक केली आहे. त्याविषयी गेल्या २ महिन्यांपासून सरकार आणि एमएमआरडीला जाब विचारत उंची वाढवण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र एमएमआरडीए-सरकार याबाबत उदासीन असल्यानं या सरकारला जागं करण्यासाठी आम्ही ६ डिसेंबरला इंदू मिलवर हल्लाबोल करणार आहोत, इंदू मिलचा ताबा घेणार आहोत, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी रमेश जाधव यांनी दिली आहे.


जाॅगिंग ट्रॅक

घटनेत ३९५ कलम आहेत, त्याप्रमाणं डाॅ. आंबेडकराच्या पुतळ्याची उंची ३९५ फुटांची करावी आणि हा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जावा, अशीही आमची मागणी असल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. तर आंदोलन नेमकं कसं असेल हे ५ डिसेंबरला जाहीर केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. सध्याचं काम पाहता सरकारकडून डाॅ. आंबेडकरांचं स्मारक नव्हे, तर शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी जाॅगिंग ट्रॅक बांधला जात असल्याचा आरोपही आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.



हेही वाचा-

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी? आनंदराज आक्रमक, आंदोलनाचा इशारा

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक २०२० पर्यंत उभारणार - मुख्यमंत्री



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा