Advertisement

कन्फर्म! आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार, स्वत:च केली घोषणा

मला स्वत:साठी नाही, तर जनतेसाठी निवडणूक लढवायची आहे, तुमची परवानगी असेल, तर मी निवडणूक लढवणार, असं म्हणत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.

कन्फर्म! आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार, स्वत:च केली घोषणा
SHARES

हिच ती वेळ आहे... नवा महाराष्ट्र घडवण्याची. मला स्वत:साठी नाही, तर जनतेसाठी निवडणूक लढवायची आहे, तुमची परवानगी असेल, तर मी निवडणूक लढवणार, असं म्हणत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. आदित्य यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना स्वत:च आपल्या उमेदवारीची घोषणा केली. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे आदित्य पहिले व्यक्ती ठरणार आहेत.  

काय म्हणाले आदित्य?

ही माझ्यासाठी ऐतिहासिक झेप आहे. मी १० वर्षांपासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. मला अनेकदा शिवसेनेच्या स्टाईलमध्ये महाराष्ट्राची सेवा कशी करता येईल, असा प्रश्न पडायचा. त्यामुळे आता मला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचं आहे. मी पक्षप्रमुखांची परवानगी घेतली आहे. तेव्हा तुम्हा सर्वांची परवानगी असेल तर सर्व महापुरुषांच्या साक्षीने मी निवडणूक लढवण्याची घोषणा करतो.

महाराष्ट्र कर्मभूमी

मला काळजी नाही. कारण तुम्ही मला सांभाळण्यास सज्ज आहात हे माहिती आहे. हे प्रेम आशिर्वाद असेच राहू द्या. माझा मतदारसंघ वरळी असला तरी संपूर्ण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. म्हणूनच मला वरळीचा विकास करताना महाराष्ट्रालाही पुढे न्यायचं आहे. वरळीसोबत मी राज्यभर फिरून प्रचार करणार आहे. कारण महाराष्ट्रात कुठेही शिवसेनेला पडलेलं मत माझ्यासाठीचं असणार आहे.

आरामात जिंकू

शिवसैनिक म्हटलं की ते जसं प्रेम व्यक्त करतात तसा रागही व्यक्त करु शकतात. त्यामुळे वरळीतून माझ्याविरोधात कुणीही उभं राहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उभं राहू द्या. त्यांना आरामात, आनंदात लढू द्या. आपण आपलं काम करु आणि जिंकू. हा निर्णय माझ्या स्वप्नासाठी नाही तर जनतेसाठी घेतला आहे. मला आमदार, मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला नाही. जनतेचं स्वप्न साकार करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. फक्त निवडणूक नाही तर लोकांच्या न्याय-हक्कांचा लढा लढण्याची हीच वेळ आहे.

हीच ती वेळ

मी जनतेचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा केली. राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मी लोकांच्या मनातील भावना ओळखण्याचा प्रयत्न केला. जनआशीर्वाद यात्रेमुळे ४० मिनिटे बोलण्याची सवय लागली, मात्र आज काय बोलावं हे कळत नाही. माझ्यामागे आई बसली आहे. हीच वेळ आहे कर्जमुक्त, सुशिक्षित, भगवा महाराष्ट्र बनवण्याची. बेरोजगारी संपवण्याची, धर्म, जातीपातीचे सगळे भेदभाव संपवत एक नवा महाराष्ट्र निर्माण करण्याची. शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याची हीच वेळ आहे.  

यावेळी आई रश्मी ठाकरे, भाऊ तेजस ठाकरे उपस्थित असले, तरी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मात्र गैरहजर होते. 



हेही वाचा-

वरळीतून आदित्य ठाकरेंची उमेदवारी निश्चित? म्हणून शरद पवारांकडे फिल्डींग

भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा