Advertisement

बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालं ‘हे’ निवडणूक चिन्ह

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना धनुष्यबाणा ऐवजी दुसऱ्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.

बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालं ‘हे’ निवडणूक चिन्ह
SHARES

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात महाराष्ट्राच्या मातीतील शिवसेनेनेही उडी घेतली असून सत्ताधाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी पक्षाकडून रणनिती आखली जात आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना धनुष्यबाणा ऐवजी दुसऱ्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमदेवारांचा आणि पक्षाचाही कस या निवडणुकीत लागणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला नुकतंच नवं चिन्ह देऊ केलं आहे. (shiv sena gets new election symbol for bihar assembly election 2020)

खरं तर या निवडणुकीत शिवसेना धनुष्यबाण या आपल्या चिन्हावर निवडणूक लढवणार होती. परंतु नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षाचं चिन्ह 'बाण' असल्याने निवडणुकीत बाण की धनुष्यबाण असा मतदारांचा गोंधळ होतो. त्यामुळे आमच्या हक्काची मते शिवसेनेला जातात, असा दावा मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी निवडणुक आयोगापुढे काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणाऐवजी दुसऱ्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा - बिहारच्या आखाड्यात महाराष्ट्र!

त्यानुसार शिवसेनेने ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन पर्यायांपैकी एक निवडणूक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली होती. परंतु ही तिन्ही चिन्हे आधीच अन्य उमेदवारांनी आरक्षित केल्याने निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे निवडणूक चिन्ह देऊ केलं होतं. परंतु शिवसेनेने या चिन्हावर आक्षेप नोंदवणारं पत्र लिहिल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्ह दिलं आहे.

बिहार निवडणुकीत शिवसेना ५० हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने आपल्या २० स्टार प्रचारकांची यादीही नुकतीच जाहीर केली होती. त्यामुळे शिवसेनेचा तुतारी वाजवणारा मावळा बिहारच्या निवडणुकीत आपली किती छाप पाडतो, याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे. 

बिहारमध्ये २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा