Advertisement

अंधेरीत चंगेझ मुलतानींचं प्रमाणपत्र अवैधच! शिवसेनेचे राजू पेडणेकर नगरसेवक घोषित

चंगेझ मुलतानी यांनी ‘ओबीसी’ या प्रवर्गातून निवडणूक लढवताना बोगस जात प्रमाणपत्र दिले असल्याची तक्रार पराभूत उमेदवाराने केली होती. त्यानुसार,जात वैधता समितीने मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले.

अंधेरीत चंगेझ मुलतानींचं प्रमाणपत्र अवैधच! शिवसेनेचे राजू पेडणेकर नगरसेवक घोषित
SHARES

अंधेरी पश्चिम प्रभाग क्र. ६२ मधील अपक्ष उमेदवार चंगेझ मुलतानी यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याच्या निर्णयावर लघुवाद न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर गुरुवारी तातडीने महापालिका सभागृह बोलावून दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे राजू पेडणेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राजू पेडणेकर यांची महापालिका सदस्य म्हणून घोषणा केली. पेडणेकर यांची नगरसेवक म्हणून घोषणा झाल्यामुळे शिवसेनेचे महापालिकेतील सदस्यबळ हे ८५वर पोहोचले आहे.


बोगस प्रमाणपत्रामुळे मुलतानी अडचणीत

फेब्रुवारी २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार चंगेझ मुलतानी हे निवडून आले होते. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला होता. परंतु, चंगेझ मुलतानी यांनी ‘ओबीसी’ या प्रवर्गातून निवडणूक लढवताना बोगस जात प्रमाणपत्र दिले असल्याची तक्रार पराभूत उमेदवाराने केली होती. त्यानुसार,जात वैधता समितीने मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यानंतर महापालिका सभागृहात घोषणा करून चंगेझ मुलतानी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.


राजू पेडणेकरांनी केली होती याचिका

दरम्यान, याप्रकरणी दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार शिवसेनेचे राजू पेडणेकर यांनी लघुवाद न्यायालयात धाव घेतली होती. या न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये मुलतानी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करून दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार राजू पेडणेकर यांना महापालिका सदस्य म्हणून घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाच्या निर्देशाची प्रत बुधवारी रात्री महापालिकेच्या विधी विभागाला प्राप्त झाली. गुरुवारी सकाळी आयुक्तांच्या माध्यमातून चिटणीस विभागाला याची प्रत प्राप्त झाली. दुपारी महापालिका सभेत प्रभाग क्रमांक ६२चे नगरसेवक म्हणून राजू पेडणेकर यांची निवड केल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.


महापालिकेतील संख्याबळ

शिवसेना – ८४ अधिक १

भाजप – ८२ अधिक १

काँग्रेस - ३१

राष्ट्रवादी - ९

स. पा. - ६

एमआयएम - २

मनसे - १

मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अजूनही त्यांचा निर्णय कोकण विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे.



हेही वाचा

जाेगेश्वरीतल्या प्रभाग ६२ च्या पोटनिवडणुकीला का दिली स्थगिती?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा