Advertisement

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणार!


राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणार!
SHARES

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट, खातेपालट झाला असला तरी राज्यातील फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मात्र सप्टेंबर संपण्यापूर्वी लागण्याची चिन्हे नाहीत.

ऑक्टोबरमध्ये फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असताना त्यापूर्वी मंत्रिमंडळात बदलाची शक्यता आहे. मात्र, 'मुंबई लाइव्ह'ला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातला विस्तार हा लांबणार आहे. त्याचे मुख्य कारण आहे, ते पितृपक्ष पंधरवडा आणि मुख्यमंत्र्यांचा विदेश दौरा!


प्रकाश मेहतांची विकेट जाणार?

पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांची प्रकरणे बाहेर काढली. विरोधकांनी मेहता आणि देसाई यांच्या प्रकरणावरून सरकारला अडचणीत आणले होते. पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे आता गप्प का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनाही कोंडीत पकडले होते. त्यामुळे, जर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तर प्रकाश मेहता यांच्याकडे असलेले गृहनिर्माण खाते काढून घेतले जाणार आहे.



राणेंची अवस्था ना घरका ना घाट का?

गेल्या काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या तारखांवर तारखा येत आहेत. मात्र, हा योग जुळता जुळेना, अशी स्थिती असल्याने राणेंची अवस्था सध्या ना घरका ना घाटका अशी झाली आहे. 'मुंबई लाइव्ह'च्या सूत्रांनुसार, राणेंचा भाजपा प्रवेश झाला तर, तो मंत्रिमंडळाच्या आधी होईल आणि त्यांना प्रकाश मेहतांचे गृहनिर्माण खातेही मिळण्याची शक्यता आहे.


शिवसेनेचे काय?

शिवसेनेनेही परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना पक्षवाढीची जबाबदारी दिल्यामुळे या तिघांची मंत्रीपदे काढून घेऊन शिवसेनेतील नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, राणेंच्या प्रवेशानंतर सेनेची गणिते काय राहणार? याबद्दल औत्सुक्य आहे.


बरेचसे राजकीय पक्ष काळ वेळ खूप पाळतात. त्यातच 6 सप्टेंबरपासून सुरू होणारा पितृपक्ष पंधरवडा संपेपर्यंत कुणालाच शपथ घेण्यात रस नाही, असे समजते. त्यातच मुख्यमंत्र्यांचा 10 ते 15 सप्टेंबरपर्यंतचा दक्षिण कोरियाचा दौरा हा विस्तार लांबणीवर टाकण्यास कारणीभूत ठरला आहे.

विवेक भावसार, ज्येष्ठ पत्रकार




हेही वाचा - 

भाजपा प्रवेश 'राणे स्टाइल`मध्ये!

तावडेंच्या मदतीला धावले राणे- तटकरे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा