Advertisement

मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, पंतप्रधान मोदींनाच पत्र

घटनेचं कलम ३११ वापरून परमबीर सिंह आणि वांद्र्याचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, पंतप्रधान मोदींनाच पत्र
SHARES

मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी तपासात कोणतीही प्रगती न केल्याने न्यायावर परिणाम झाला. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या हकालपट्टीबाबत १० दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, त्याचं साधं उत्तर देण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. त्यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून घटनेचं कलम ३११ वापरून परमबीर सिंह आणि वांद्र्याचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. (suspend mumbai police commissioner param bir singh demands bjp mla atul bhatkhalkar and wrote a letter to pm modi)

यासंदर्भात बोलताना अतुल भातखळकर म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास जसजसा उघड होत चालला आहे. याच्यावरून हे स्पष्ट होत चाललंय की मुंबई पोलिसांनी या विषयामध्ये केवळ हलगर्जीपणा केला नाही, तर क्रिमिनल निग्लिजन्स दाखवलेला आहे. आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तर पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीला देखील प्रारंभ केला आहे. या स्थितीमध्ये हे दोन्ही अधिकारी आपापल्या पदावर राहणं हे न्यायाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक होईल. त्यामुळे मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि वांद्रा विभागाचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे या दोघांनाही भारतीय घटनेच्या ३११ कलमांतर्गत तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - मुंबई पोलिसांना काम करू न देणारा सरकारमधील व्यक्ती कोण?- आशिष शेलार

अतुल भातखळकर यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, मुंबई पोलिसांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत अपघाती मृत्यू अशी नोंद केली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ६५ दिवस कोणताही एफआयआर दाखल केला नाही. रिया चक्रवर्ती सुशांतची नातेवाईक नसूनही तिला कूपर रुग्णालयाच्या शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली. कोरोना चाचणीविनाच मृतदेहाचं ऑटोस्पाय करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून डाॅक्टरांवर दबाव टाकण्यात आला. ईडीने मागणी करुनही मुंबई पोलिसांनी लॅपटॉप, मोबाइल, हे पुरावे दिले नाहीत.

पोलिसांकडून माध्यमांसमोर मृताची खाजगी माहिती सार्वजनिक करण्यात आली. बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आलं. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीला परवानगी देत एफआयआर वैध ठरवला. तोपर्यंत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई पोलिसांनी तपासात कोणतीही प्रगती केली नाही. परमबिर सिंह हे कुणाला तरी क्लीनचिट देण्यासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट होतं. या प्रकरणाचे तपास अधिकारी त्रिमुखे यांचं वर्तनही संशयास्पद असून ते रिया चक्रवर्तीच्या संपर्कात होते. त्यामुळे न्यायावर परिणाम झाला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीवर सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती.  

म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भादंवि कलम ३११(२)(ब) आणि (क) अंतर्गत या दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं, असं भातखळकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा - सुशांत राजपूत प्रकरण : सीबीआयच्या रडारवर मुंबई पोलिस, तपास अधिकाऱ्यांना समन्स

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा